मुंबई : गेल्याच महिन्यात कोट्यवधींच्या बुलेटप्रूफ बीएमडब्ल्यूची नोंदणी ताडदेव आरटीओत केल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी आणखी एक महागडी बुलेटप्रूफ गाडी विकत घेतली आहे. तब्बल साडेनऊ कोटी रुपये किंमत असलेल्या मर्सिडीज बेन्झची ताडदेव आरटीओत नोंदणी करताना १ कोटी ९१ लाख रुपये भरले आहेत. त्यामुळे गेल्या महिन्यापासून आतापर्यंत एकूण ३ कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम आरटीओकडे जमा झाली आहे. मुकेश अंबानी यांनी गेल्या महिन्यात तब्बल ८ कोटी १४ लाख रुपये किमतीची बुलेटप्रूफ अशी ७६0 एलआय प्रकारातील बीएमडब्ल्यू विकत घेतली. त्या वेळी या कारची नोंदणी करताना १ कोटी ६७ लाख रुपये एवढा कर भरला. त्याचप्रमाणे या कारच्या विशेष नंबर प्लेटसाठी २ लाख १0 हजार रुपयेही भरले होते. पंतप्रधानांच्या सुरक्षा ताफ्यातही याच मॉडेलमधील कार असून बुलेटप्रूफ असलेल्या या कारमध्ये वायफाय, एलईडी लाइट्स, कॅमेऱ्यासह अन्य सुविधा आहेत. या कारची बरीच चर्चा रंगलेली असतानाच अंबानी यांनी आणखी एक महागडी कार विकत घेतली. बीएमडब्ल्यू असलेल्या या कारची किंमत तब्बल ९ कोटी ६१ लाख रुपये असून तब्बल १ कोटी ९१ लाखांचा कर आरटीओत भरला आहे. तसेच कारच्या नंबर प्लेटसाठीही ७0 हजार रुपये मोजण्यात आल्याचे आरटीओकडून सांगण्यात आले.
अंबानींच्या गाड्यांमुळे आरटीओ मालामाल
By admin | Updated: June 24, 2015 05:01 IST