Join us
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई प्रवेश प्रक्रिया शुक्रवारपासून होणार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:07 IST

पालकांना दिलासा; ८२ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग माेकळालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : यंदाच्या शैक्षणिक वर्षाची दुर्बल व ...

पालकांना दिलासा; ८२ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग माेकळा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : यंदाच्या शैक्षणिक वर्षाची दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठीची आरटीई प्रवेश प्रक्रिया येत्या शुक्रवारपासून म्हणजेच ११ जूनपासून सुरू होईल. शाळांनी ऑनलाईन लॉटरीतून प्रवेशास पात्र झालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून त्यांना तात्पुरता प्रवेश द्यावा, प्रवेश निश्चितीसाठी २० दिवसांचा कालावधी द्यावा, अशा सूचना प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी केल्या आहेत. त्यामुळे मुंबईसह राज्यातील ८२ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना आरटीईमधून प्रवेश घेऊन ऑनलाईन शिक्षण सुरू करता येईल.

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित जागांवर प्रवेश दिले जातात. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील प्रवेशासाठी अर्ज मागवून लॉटरी काढण्यात आली. मात्र प्रत्यक्ष शाळेत जाऊन प्रवेश घेण्याच्या प्रक्रियेला कोरोनामुळे सुरुवात करण्यात आली नव्हती. परंतु, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शाळेत गर्दी न करता काेराेनासंदर्भात शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून पालकांनी पाल्याचा प्रवेश घ्यावा, अशा सूचना शिक्षण संचालकांनी दिल्या.

राज्यातील ९ हजार ४३२ शाळातील ९६ हजार ६८४ जागांसाठी आरटीई प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. लॉटरीतून प्रवेश मिळालेल्या पालकांनी अर्जासोबत जोडलेले कागदपत्र घेऊन शाळेत दिलेल्या मुदतीत जायचे आहे. अर्ज भरताना आदिवासी पुराव्यामध्ये चुकीचे अंतर दाखविले असल्यास संबंधित विद्यार्थ्याला प्रवेश देऊ नये, असे जगताप यांनी स्पष्ट केले आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ज्या पालकांना दिलेल्या मुदतीत आपल्या पाल्याचा प्रवेश शाळेत जाऊन करणे शक्य होणार नाही, अशा पालकांनी दूरध्वनी ई-मेलद्वारे शाळेशी संपर्क साधून प्रवेशाची कार्यवाही करता येईल. निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाईल. याबाबतची माहिती पोर्टलवर प्रसिद्ध केली जाईल, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

* जिल्हा - जागा - निवड झालेले विद्यार्थी

पुणे - १४,७७३- १४,५७६

मुंबई - ५,२२७- ३,८२५

ठाणे - १२,०७४- ९,०८८

कोल्हापूर- ३,१८१- २,१३७

सातारा - १,९१६- १,५९५

नाशिक - ४,५४४- ४,२०८

औरंगाबाद - ३,६२५- ३,४७०

----------------------------------