Join us

मेट्रो चारच्या मार्गिकांसाठी ८० कोटींचे रूळ; उच्चतम दर्जाचे रूळ दाखल होणार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 06:10 IST

Metro : सर्वसामान्य रेल्वे ट्रॅक आणि मेट्रो ट्रॅकसाठी वापरले जाणारे रूळ (हेड हार्डन्ड रेल) वेगवेगळे आहेत. मेट्रोच्या रुळांमध्ये ५० टक्के जास्त भार पेलण्याची क्षमता असेल.

मुंबई : वडाळ्याहून ठाण्याच्या दिशेने धावणाऱ्या मेट्रो ४ या प्रकल्पाचे काम सध्या वेगाने सुरू असून ही मेट्रो ज्या रुळांवरून धावणार आहे त्यासाठी सुमारे ८० कोटी रुपये खर्च येणार आहे. या रुळांचे वजन ९८०० मेट्रिक टन असेल अशी माहिती माहिती हाती आली आहे. सर्वसामान्य रेल्वे ट्रॅक आणि मेट्रो ट्रॅकसाठी वापरले जाणारे रूळ (हेड हार्डन्ड रेल) वेगवेगळे आहेत. मेट्रोच्या रुळांमध्ये ५० टक्के जास्त भार पेलण्याची क्षमता असेल.   ३२.२ किमी लांबीच्या या मेट्रो मार्गिकेच्या पायलिंगचे काम ५८ टक्के पूर्ण झाले असून यूगर्डरचे काम २० टक्के आणि अन्य आघाड्यांवरील कामांची प्रगती ३५ ते ४५ टक्क्यांच्या आसपास आहे. २०२२ च्या अखेरीस या मेट्रोसह गायमुखपर्यंतची मेट्रो ४ अ सुध्दा प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल असा अंदाज आहे. या दोन्ही मार्गिकेसाठी आवश्यक असलेल्या रोलिंग स्टाॅक (रेक) निविदा यापूर्वीच काढण्यात आलेल्या आहेत. तसेच, सिग्नलिंग व्यवस्थेसाठीची निविदा प्रक्रियासुध्दा प्रगतीपथावर आहे. त्या पाठोपाठ आता या रूळ पुरवठ्यासाठी एमएमआरडीएने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.   या मार्गिकेसाठी स्पेशल हिट ट्रिटमेंटचा वापर करून तयार केलेल्या रुळांची आवश्यकता आहे. त्यामुळे मेट्रो मार्गिकांमध्ये अतिरिक्त भार पेलण्याची क्षमता निर्माण होते. रुळांचे आयुर्मान वाढते आणि कमीत कमी देखभाल दुरुस्तीची गरज भासते. त्यासाठीचा सुमारे ८० कोटी ४६ लाख रुपये खर्च येईल असा एमएमआरडीएचा अंदाज आहे. मात्र, निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच खर्चाबाबत अधिकृत भाष्य करता येईल, असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

भारतात एकमेव कंपनीमेट्रो प्रकल्पांसाठी आवश्यक असलेले जास्त क्षमतेचे रूळ बनविणारी भारतातील पहिली कंपनी जेएसपीएल असून त्यांनी चार वर्षांपूर्वी छत्तीसगड येथे आपला प्लाण्ट सुरू केला आहे. त्यांच्याशिवाय भारतात कुठेही या रुळांचे उत्पादन होत नाही. स्टील ॲथॉरिटी ऑफ इंडियाने या रुळांचे उत्पादन करण्याची घोषणा केली आहे. मात्र, अद्याप ती प्रक्रिया सुरू झालेली नाही. रुळांसाठी जेएसपीएलची स्पर्धा परदेशी कंपन्यांशी असेल. 

टॅग्स :मुंबई