Join us

आरपीआयचा जनाधार घसरला

By admin | Updated: May 3, 2015 23:57 IST

महापालिका निवडणूक स्वबळावर लढविणाऱ्या आरपीआयचा (आठवले गट) शहरातील जनाधार घटला आहे. पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढणाऱ्या ११ उ

नवी मुंबई : महापालिका निवडणूक स्वबळावर लढविणाऱ्या आरपीआयचा (आठवले गट) शहरातील जनाधार घटला आहे. पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढणाऱ्या ११ उमेदवारांना फक्त ९६१ मते मिळाली आहेत. दोन उमेदवारांना तीन आकडी संख्या गाठण्यात यश आले असून सर्वांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. महानगरपालिका निवडणुकीमध्ये मतदारांनी छोट्या पक्षांकडे पाठ फिरविली आहे. काँगे्रस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा वगळता इतर पक्षांना मते देण्यापेक्षा अपक्षांना पसंती दिली आहे. आरपीआयचीही निवडणुकीमध्ये वाताहत झाली आहे. स्वबळावर निवडणूक लढणाऱ्या पक्षास सर्व प्रभागांमध्ये उमेदवारही उभे करता आलेले नाहीत. ११ प्रभागांमध्ये उमेदवार उभे करण्यात आले होते. रबाळेमधील सुधाकर सोनावणे व रंजना सोनावणे यांनी ऐन निवडणुकीमध्ये आरपीआयच्या ऐवजी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते राजेश शिंदे यांच्या पत्नीला शिवसेनेच्या तिकिटावर उभे करावे लागले. पक्षाच्या नावावर मते मागणाऱ्या उमेदवारांकडेही मतदारांनी पाठ फिरविली आहे. प्रभाग १५ मधील शशिकला जाधव यांना २३५ व चंद्रकांत जगताप यांना १८६ मते वगळता एकाही उमेदवारास मतांचे शतक पार करता आलेले नाही. सर्व उमेदवारांची बेरीज फक्त ९६१ एवढीच झाली आहे. पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सभा घेतल्यानंतरही त्याचा परिणाम झालेला नाही. आरपीआयने शहरात अनेक विषयांवर आंदोलने करून संघटना वाढविण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांचे मेळावेही घेतले. परंतु त्याचा फारसा उपयोग झालेला नाही. पक्षाचे नवी मुुंबई अध्यक्ष सिद्राम ओहोळ यांनी सांगितले की, पक्षाची ताकद झोपडपट्टी परिसरात आहे. परंतु दिघा व इतर अनेक ठिकाणी प्रभाग ओबीसीसाठी राखीव झाले. आरपीआयला सक्षम उमेदवारच मिळालेला नाही. यामुळे आरक्षणाचा फटका अनेक ठिकाणी बसला आहे. सिडको विकसित नोडमध्ये पक्षाने नशीब आजमावले. उमेदवार उभेही केले पण त्यांना मते मिळाली नाहीत. अनेक ठिकाणी शिवसेना, भाजपाच्या उमेदवारांना मदत करण्याची भूमिका घेतली. यामुळे आमचा जनाधार कमी झाला असे आम्ही मानत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यापुढे संघटना बांधताना सोशल इंजिनीअरिंगला प्राधान्य देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)