Join us

रहिवाशांचा पालिका कार्यालयावर धडक मोर्चा

By admin | Updated: November 25, 2015 02:39 IST

चेंबूरच्या आनंदनगरमध्ये असलेली धोकादायक देवालय इमारत पाडण्याच्या नावाखाली पालिकेकडून लवकरच या भागातील दीडशे झोपड्यांवर हातोडा पडणार आहे.

मुंबई : चेंबूरच्या आनंदनगरमध्ये असलेली धोकादायक देवालय इमारत पाडण्याच्या नावाखाली पालिकेकडून लवकरच या भागातील दीडशे झोपड्यांवर हातोडा पडणार आहे. या कारवाईला विरोध करण्यासाठी मंगळवारी या परिसरातील रहिवाशांनी पालिकेच्या एम पश्चिम कार्यालयावर धडक मोर्चा काढत पालिकेविरोधात जोरदार निदर्शने केली. एन.जी. आचार्य मार्गावरील आनंद नगराच्या पाठीमागे असलेल्या एका मोकळ्या भूखंडावर १९८४ साली पालिकेच्या अधिकाऱ्यांनी गृहनिर्माण संस्था स्थापन करून देवालय नावाची खासगी इमारत बांधली. मात्र अनेक वर्षे या इमारतीची डागडुजी न झाल्याने या इमारतीची मोठी दुरवस्था झाली होती. त्यानंतर या अधिकाऱ्यांनी त्यांची घरे भाड्याने दिली. मात्र गेल्या सात ते आठ वर्षांपासून ही इमारत पालिकेने धोकादायक म्हणून घोषित केली होती. त्यानंतर देखील या इमारतीमध्ये अनेक कुटुंबे वास्तव्यास होती. मात्र साफसफाई नसल्याने इमारतीच्या तळमजल्यावर मोठ्या प्रमाणात सांडपाणी जमा होत असल्याने इमारतीचा पायाच पूर्णपणे खचला होता. त्यामुळे ही इमारत कोसळण्याची भीती होती. याबाबत येथील स्थानिक रहिवासी आणि राजकीय कार्यकर्त्यांनी पालिकेला पत्रव्यवहार केल्यानंतर पालिकेने ही इमारत पाडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार येत्या काही दिवसांत ही इमारत पाडण्यात येणार आहे. मात्र इमारत पाडल्यानंतर डेब्रिज घेऊन जाण्यासाठी पालिकेला या ठिकाणी मोठा रस्ता हवा आहे. यासाठी पालिकेने येथील दीडशे झोपड्या हटवण्याचे ठरवले आहे. मात्र रहिवाशांनी याला विरोध दर्शवला आहे. हा विरोध मोडत पालिकेकडून सर्व्हे सुरू करण्यात आल्याने संतापलेल्या रहिवाशांनी आज धडक मोर्चा काढला. (प्रतिनिधी)