Join us

समृद्धी महामार्गावरील वृक्ष लागवडीसाठी फेरनिविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:10 IST

नव्या निकषाचा समावेश : आधी कंत्राटदारांची पात्रता, मग बोलीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर तब्बल ६७८ ...

नव्या निकषाचा समावेश : आधी कंत्राटदारांची पात्रता, मग बोली

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर तब्बल ६७८ कोटी रुपये खर्च करून वृक्ष लागवडीसाठी एमएसआरडीसीने फेरनिविदा प्रसिद्ध केल्या आहेत. नव्या निविदा प्रक्रियेनुसार आता या कामासाठी कंत्राटदारांची पात्रता (प्री-बिड क्वालिफिकेशन) ठरवली जाईल. त्यानंतर याच पात्र निविदाकारांना प्रत्यक्ष निविदा प्रक्रियेत बोली लावण्याची संधी देऊन काम दिले जाईल.

समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यापूर्वी रस्त्याच्या दुतर्फा सुमारे १२ लाख ६८ हजार ३४६ वृक्ष, महामार्गाच्या मधोमध १२ लाख ८७ हजार ३२० छोट्या वनस्पती आणि संरक्षक भिंतीच्या आत ३ लाख २१ हजार ८०३ बांबूंची लागवड करण्याचे नियोजन आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाने या कामासाठी सप्टेंबर महिन्यात १५ पॅकेजमध्ये निविदा काढल्या होत्या. मात्र, तडकाफडकी ही निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. आता या कामासाठी नव्याने निविदा प्रसिद्ध केली असली तरी त्यात प्री-बिड क्वालिफिकेशनची अट समाविष्ट करण्यात आली आहे.

या कामांसाठी सुरुवातीला थेट बोली लावण्याची अट निविदाकारांना होती. मात्र, आता हे काम करण्यासाठी कंत्राटदार पात्र आहेत की नाहीत याची निश्चिती आधी केली जाईल. त्यानंतर निविदाकारांनाच पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरविले जाईल. काही विशिष्ट कंत्राटदारांना या कामांमध्ये पात्र ठरविण्यासाठी हे बदल केल्याचा आक्षेप घेतला जात आहे. मात्र, त्यात तथ्य नसून अनेक मोठ्या कामांमध्ये या प्रक्रियेचा अवलंब केला जातो. निविदा ऑनलाइन असल्यामुळे गैरव्यवहाराला वाव नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.