Join us

एकाच मैदानासाठी रस्सीखेच

By admin | Updated: October 10, 2014 23:39 IST

सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पटनी येथील पूर्वनियोजित सभा ठाण्यातील सेंट्रल मैदान येथे घेण्याचे ठरले होते.

ठाणे : सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पटनी येथील पूर्वनियोजित सभा ठाण्यातील सेंट्रल मैदान येथे घेण्याचे ठरले होते. आता पुन्हा या सभेचे मैदान बदलले असून बाळकुम येथील मैदानात ही सभा होणार आहे. परंतु हे मैदान यापूर्वीच राष्ट्रवादीने बुक केल्याने आता या मैदानावरुन राष्ट्रवादी आणि भाजपा आमने सामने आली आहे. मैदान सोडणार नसल्याची भाषा राष्ट्रवादीने केल्याने आता भाजपाबरोबर आणि पोलिसही अडचणीत आले आहेत. त्यामुळे हायलॅन्डचे मैदान कोण मारणार हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. तरी आता पोलिसांच्या म्हणण्यानुसार १०० फुट अंतरावर ही दोन मैदाने असून, तेथे या सभा होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु आता या दोनही सभा एकाच वेळी होणार हे ही आता स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा कुठे घ्यायची यावरुन सध्या ठाण्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. सुरुवातीला सेंट्रल मैदानात सभा व्हावी, यासाठी भाजपाचे कार्यकर्ते आग्रही होते. परंतु, पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव ही सभा नवी मुंबईतील पटनी येथे घेण्याची सूचना भाजपा नेत्यांकडे केली होती. परंतु सेंट्रल मैदानातच ही सभा व्हावी असा अट्टाहास झाल्याने अखेर हे मैदान निश्चित झाले होते. परंतु पुन्हा पोलिसांनी सुरक्षेचे कारण पुढे करीत या ठिकाणात बदल करुन ही सभा बाळकुम येथील हायलँड पार्कच्या पाठीमागच्या मैदानात घेण्याचे सुचविले. भाजपाने देखील या संदर्भात एकमत दर्शविले. सध्या हे ठिकाण मोदींच्या सभेसाठी अंतिम करण्यात आल्याची चर्चा आहे. परंतु याच दिवशी या मैदानावर राष्ट्रवादीची देखील सभा होणार आहे. हे मैदान मिळावे, यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तीन दिवस आधीच हे मैदान आरक्षित केले होते. त्यानुसार ११ तारखेला राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि १२ तारेखला अजित पवार यांची सभा येथे होणार आहे. परंतु आता तेच मैदान भाजपाला सुध्दा देण्यात आल्याने, राष्ट्रवादी आणि भाजपाचे पदाधिकारी एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. (प्रतिनिधी)