Join us

रुळांना तडे जाऊन ‘मरे’ विस्कळीत

By admin | Updated: January 14, 2016 00:37 IST

मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर तीन ठिकाणी रुळाला तडा गेल्यामुळे आणि दिवा स्थानकाजवळ इंजिनात बिघाड झाल्याने बुधवारी लोकल सेवेचे तीन तेरा वाजले.

मुंबई/ डोंबिवली- मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर तीन ठिकाणी रुळाला तडा गेल्यामुळे आणि दिवा स्थानकाजवळ इंजिनात बिघाड झाल्याने बुधवारी लोकल सेवेचे तीन तेरा वाजले. सकाळी सहा ते नऊ या वेळेत लोकल सेवेचा पुरता बोजवारा उडाला. दिवा स्थानकाजवळ सकाळी साडे सात वाजता अप मार्गावर प्रतापगढ एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाला. त्यामुळे अपमार्गे, कसारा व कर्जतमार्गे तसेच कल्याणहून येणाऱ्या जलद गाड्या ठिकठिकाणी खोळंबल्या. त्यामुळे सीएसटीच्या दिशेने येणाऱ्या जलद लोकल सेवांवर परिणाम झाला. पाऊण तासांत इंजिन दुरुस्त करण्यात आले आणि मार्ग मोकळा केला गेला. मात्र यामुळे वेळापत्रक कोलमडले. तीन तासांत तीन ठिकाणी रुळाला तडा जाण्याच्या घटनाही घडल्या. कल्याण स्थानकाजवळ, नंतर माटुंगा व सायन स्टेशन दरम्यान डाऊन जलदवर व कर्जत स्थानकाजवळही रुळाला तडा गेला. त्यामुळे लोकल अन्य मार्गावरुन चालवाव्या लागल्या. परिणामी सर्व गाड्या पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावू लागल्या. सात फेऱ्या रद्द करण्यात आल्या. तर ४0 गाड्या उशिराने धावल्या. कुर्ला रेल्वे टर्मिनस येथे इंजिनावर ३0 वर्षीय इसम चढला. तो शॉक लागून जखमी झाला. (प्रतिनिधी)