Join us  

परीक्षा भवनाच्या छताचा भाग कोसळला; जीवितहानी नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 1:20 AM

अद्याप परीक्षा भवन नवीन इमारतीत स्थलांतरित नाही

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील परीक्षा भवन म्हणजे तेथे काम करणारे अधिकारी आणि विविध कामांसाठी येणारे विद्यार्थी, पालक यांच्यासाठी टांगती तलवारच आहे. या टांगत्या तलवारीचा धसका पुन्हा एकदा तेथील अधिकारी आणि विद्यार्थ्यांना बसला. गुरुवारी सायंकाळच्या वेळेस परीक्षा भवनाच्या तिसऱ्या माळ्यावरील छताचा काही भाग अचानक कोसळला. या घटनेमध्ये काहीही जीवितहानी झाली नसली तरी या घटनेचा धसका तेथे उपस्थित अधिकारी, विद्यार्थी आणि कर्मचारी वर्गाने घेतला आहे. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा भवनांची नवीन इमारत तयार असताना, तेथे परीक्षा भवन स्थलांतरित होणे अपेक्षित असताना जुन्या व जीर्ण इमारतीमध्ये परीक्षा भवनाचा कारभार सुरू ठेवण्याच्या मुंबई विद्यापीठ प्रशासनाच्या भूमिकेबद्दल आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात विद्यापीठाचे परीक्षा भवन आहे. विविध विभागांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा, निकाल त्याविषयीच्या समस्या आणि परीक्षांसाठी इतर समस्या, मार्गदर्शनासाठी येथे विद्यार्थी, पालकांची वर्दळ नेहमी असते. या परिसरात परीक्षा भवनाची इमारत अतिशय जुनी आणि जीर्णावस्थेत आहे. परीक्षा विभागावरील वाढता ताण लक्षात घेता, कर्मचाऱ्यांची वाढती संख्या, अपुºया जागेमुळे आता कर्मचाºयांना तिथे बसायलाही जागा कमी पडत आहे. त्यातच परीक्षा विभागाने अनेक नव्या प्रणाली अवगत केल्याने अद्ययावत कॅप सेंटर उभारण्याचा संकल्प प्रशासनाने निश्चित केला होता. त्यानुसार परीक्षा भवनाची नवीन इमारत बांधून तयार झाली आहे. त्यानंतरही परीक्षा विभाग या ठिकाणी स्थलांतरित केला नाही. यासंबंधित सिनेट सद्स्या शीतल शेठ देवरुखकर यांनी सिनेटमध्ये स्थगन प्रस्तावही मांडला.

विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका आणि इतर कागदपत्रांचा अक्षरश: खच परीक्षा भवनातील प्रत्येक मजल्यावर पडलेला आहे. या ठिकाणी दररोज हजारो विद्यार्थी भेट देत असल्याने त्यांनाही याचा फटका बसतो. या पार्श्वभूमीवर परीक्षा भवनाच्या स्थलांतराची आवश्यकता व विद्यार्थी हित लक्षात घेऊन इतर सिनेट सदस्यांनीही हा प्रस्ताव लावून ठेवला. त्या वेळी कुलगुरूंनी लवकरच परीक्षा भवनातील कामकाज नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित करू, असे आश्वासन दिल्याची माहिती शीतल शेठ यांनी दिली. प्रत्यक्षात मात्र यावर अद्याप कार्यवाही झाली नसून विद्यार्थी आणि अधिकारी, कार्मचारी यांच्या जीवाशी खेळ असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर कुलगुरू सुहास पेडणेकर यांनी त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली असून परीक्षा भवन नव्या इमारतीत शिफ्ट होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक आशुतोष राठोड यांनी दिली.

टॅग्स :मुंबई विद्यापीठ