Join us  

Rohit pawar : 'फडणवीसजी, तुमच्या वक्तव्यामुळं जनतेमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 1:35 PM

मंत्री नवाब मलिक यांनी राज्य सरकार मोफत लस देणार असल्याची घोषणा केली. मात्र, आदित्य ठाकरेंनी मोफत लस देण्यासंदर्भातील ट्विट डिलीट केले आहे.

ठळक मुद्देमोफत लसीकरणाविषयी विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलं आहेत प्रत्येक पात्र व्यक्तीला केंद्र सरकार मोफत लस देणार आहे. त्यामुळे राज्यांवर याचा भार नाही

मुंबई - राज्यात मोफत कोरोना लस देण्याबाबत मंत्र्यांमध्ये मतभिन्नता असतानाच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. "मोफत लसीकरणाबाबतची भूमिका पंतप्रधानांनी स्पष्ट केली आहे. तरीही मंत्र्यांकडून विविध वक्तव्ये केली जात आहेत, कुठलं धोरण आहे, ट्वीट का केले जातात, का डिलीट केले जातात याबद्दल मला कल्पना नाही, मी बोलणार नाही," असं फडणवीस म्हणाले. फडणवीस यांच्या विधानानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी त्यांचे ते विधान चुकीचं असल्याचं म्हटलंय. 

मंत्री नवाब मलिक यांनी राज्य सरकार मोफत लस देणार असल्याची घोषणा केली. मात्र, आदित्य ठाकरेंनी मोफत लस देण्यासंदर्भातील ट्विट डिलीट केले आहे. त्यामुळे, भाजप नेत्यांनी मोफत लसीकरणाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलंय. मुंबईतील अंधेरीमध्ये कोविड केअर सेंटरचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं. त्यावेळी, बोलताना फडणवीस यांनी, लसीचा भार राज्य सरकारवर असणार नसल्याचे सांगितले. त्यावरुन, रोहित पवार यांनी फडणवीसांच्या वक्तव्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होईल, असे म्हटलंय.  ''सन्माननीय विरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis जी 'केंद्र सरकार मोफत लसीकरण करत असून राज्यांवर लसीकरणाचा भार येणार नाही', असं माध्यमांशी बोलताना आपलं वक्तव्य ऐकलं. कदाचित आपल्याकडून घाईत हे चुकीचं वक्तव्य झालं असावं. पण यामुळं जनतेमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो.'', असे ट्विट रोहित पवार यांनी केलंय. 

मोफत लसीकरणाबाबत फडणवीस म्हणतात

मोफत लसीकरणाविषयी विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलं आहेत प्रत्येक पात्र व्यक्तीला केंद्र सरकार मोफत लस देणार आहे. त्यामुळे राज्यांवर याचा भार नाही. प्रत्येक भारतीयाकरता केंद्र सरकारने व्यवस्था केली आहे आणि त्यातून ही लस उपलब्ध होणार आहे. मंत्र्यांकडून विविध वक्तव्ये केली जात आहेत, कुठलं धोरण आहे, ट्वीट का केले जातात, का डिलीट केले जातात याबद्दल मला कल्पना नाही, मी बोलणार नाही. पण पंतप्रधानांनी भूमिका स्पष्ट केली आहे." 

टॅग्स :देवेंद्र फडणवीससरकारकोरोनाची लस