Join us

माल डबा गर्दुल्ले आणि दारुड्यांसाठी आहे का ?

By सचिन लुंगसे | Updated: August 11, 2025 13:19 IST

'सस्ता नशा' प्रवाशांसाठी ठरतो तापदायक

सचिन लुंगसे

मुंबई : लोकलच्या माल डब्यातून रात्री अपरात्री आणि दिवसादेखील गर्दुल्ले व दारुडे प्रवास करत असल्याचे चित्र आहे. सामान घेऊन जाणाऱ्या प्रवाशांना गर्दुल्ल्यांचा त्रास होतो. विरोध करणाऱ्या लोकांना वादाला सामोरे जावे लागते. विशेषतः सामान घेऊन जाणाऱ्या महिला प्रवाशांना त्रासाले सामोर जावे लागते. त्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होतो.

मध्य रेल्वेची मुख्य मार्गिका आणि हार्बर मार्गिकेसोबतच पश्चिम रेल्वेच्या लोकल माल डब्यातून दुपारी आणि रात्री अपरात्री कित्येक वेळा गर्दुल्ले आणि दारुडे प्रवासी प्रवास करत असतात. मुळात हे प्रवासी, प्रवासी नसतातच. एका रेल्वे स्थानकांकडून दुसऱ्या स्थानकाकडे सहज म्हणून ते प्रवास करतात. मध्य रेल्वे मार्गावर मशीद बंदर, सँडहर्स्ट रोड, भायखळा, माटुंगा, कुर्ला, विद्याविहार 7C आणि कांजूरमार्ग या रेल्वे स्थानकातून सहजपणे गर्दुल्ले या डब्यात प्रवेश करतात. ठाण्यापासून थेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत रात्री-अपरात्री त्यांचा प्रवास सुरू असतो. हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला, शिवडी, वडाळा, रे रोड, गोवंडी या रेल्वे स्थानकांवर गर्दुल्लांचा अतोनात त्रास आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर वांद्रे आणि खार रोड या रेल्वे स्थानकातून गर्दुल्ले लोकलमध्ये प्रवेश करतात. लोकलच्या दरवाजात उभे राहून इतर प्रवासी व महिला प्रवाशांना त्रास देणे, लोकलमधील सीटवर झोपणे किंवा मिळेल त्या जागेत हातपाय पसरणे असा त्यांचा दिनक्रम असतो. अमली पदार्थांच्या आहारी गेल्याने आणि कायम नशेत असल्याने पोलिस देखील बऱ्याचदा त्यांना हात लावत नाही. 'सस्ता नशा' म्हणून ओळख असलेल्या कित्येक अमली पदार्थाचे सेवन ते करतात. माल डब्यात रात्री काही जण दारू पितानाही आढळले आहेत.

अमली पदार्थांची विक्री 

कुर्ला, शिवडी, रे रोड, गोवंडी, महालक्ष्मी, वडाळा या रेल्वे स्थानकांच्या परिसरात अफू, गांजा यांसारख्या मादक पदार्थांची लपून-छपून पद्धतीने विक्री केली जाते. कुर्ला येथे तर दिवसाढवळ्या देखील हे मादक पदार्थ गर्दुल्ले आणि दारुड्यांना सहज उपलब्ध होतात.

रेल्वे पोलिसांचे म्हणणे काय ?

कुर्ला परिसरात संबंधितांवर कारवाई करणाऱ्या पोलिसांशी यासंदर्भात संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, आम्ही कित्येक वेळा गर्दुल्ले आणि दारुड्या लोकांना पकडून कारवाई केली आहे. त्यांना त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यावर उपचार केले आहेत. मात्र हे लोक त्यातून बाहेर पडत नाहीत.

हे लोक नशेच्या एवढे आहारी गेलेले असतात की त्यांना वेळेवर नशा करता आली नाही तर ते वेड्यासारखे करतात. त्यांना पकडून कोठडीत टाकले किंवा त्यांच्यावर कारवाई केली, तरी काही फरक पडत नाही. कुठेतरी एखादा माणूस यातून बाहेर पडतो. मात्र, ही शक्यता फार कमी असते. 

टॅग्स :मुंबईमुंबई लोकल