Join us  

दक्षिण मुंबईत पाहिले स्वयंचलित वाहनतळ खुले, रोबोटिक तंत्रज्ञानावर आधारित २१ मजली, २४० वाहन 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 7:34 PM

Automatic Parking Mumbai : २१ मजल्यांच्या या वाहनतळाच्या प्रवेशद्वारावरील भव्य पोलादी ‘प्लेट’ वर वाहन केल्यानंतर त्याची नोंद रिसेप्शन काऊंटरवर संगणकीय पद्धतीने केली जाते.

मुंबई - रोबोटिक तंत्रज्ञानावर आधारित महापालिकेच्या पहिल्या स्वयंचलित सार्वजनिक वाहनतळ गुरुवारपासून सुरू करण्यात आले आहे. दक्षिण मुंबईतील भुलाबाई देसाई मार्गालगत व महालक्ष्मी मंदिराजवळ असणाऱ्या हबटाऊन स्कायबे या इमारतीमध्ये हे २१ मजली वाहनतळ आहे. या ठिकाणी २४० वाहने उभी करण्याची सोय आहे. या वाहनतळ २४ तास खुले असणार आहे. 

या वाहनतळाचे लोकार्पण राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. मुंबईतील वाहनांची संख्या वाढत असल्याने पार्किंगची मागणीही वाढ आहे. त्यामुळे वाहनतळाच्या नियोजनासाठी महापालिकेचे अनेक प्रयोग सुरू आहेत. या अंतर्गत दक्षिण मुंबईतील भुलाभाई देसाई मार्ग येथे पालिकेच्या ताब्यातील वाहनतळाचे नुतनीकरण करून स्वयंचलित पद्धतीने वाहनं उभी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

असे आहे स्वयंचलित वाहनतळ....

२१ मजल्यांच्या या वाहनतळाच्या प्रवेशद्वारावरील भव्य पोलादी ‘प्लेट’ वर वाहन केल्यानंतर त्याची नोंद रिसेप्शन काऊंटरवर संगणकीय पद्धतीने केली जाते. त्यानंतर वाहन उभी असलेली पोलादी प्लेट स्वयंचलित पद्धतीने वाहनासह वाहनतळामध्ये प्रवेश करते. यानंतर भव्य लिफ्टमध्ये वाहनं स्वयंचलित पद्धतीने सरकवले जाते. त्यांनतर ज्या मजल्यावर जागा उपलब्ध असेल त्या पार्किंगच्या ठिकाणी लिफ्ट स्वयंचलित पद्धतीनेच जाऊन ‘कार’ पार्क केली जाते. वाहन बाहेर काढतानाही स्वयंचलित पद्धतीनेच बाहेर पडते. 

२१ मजली वाहनतळामध्ये साधारणपणे २४० वाहने उभी करता येईल. या वाहनतळाला दोन प्रवेशद्वारे असून दोन बहिर्गमन द्वारे आहेत. या वाहनतळाची स्वयंचलित प्रचालन क्षमता ही दर तासाला ६० वाहनांचे प्रचालन करण्याइतकी आहे.

हे वाहनतळ आठवड्याचे सातही दिवस व दिवसाचे २४ तास कार्यरत राहणार आहे.  हे वाहनतळ उभारण्यासाठी वापरण्यात आलेल्या सामुग्रीपैकी ८० टक्के सामुग्री भारतीय असून २० टक्के सामुग्री ही आयात केलेली आहे.

या वाहनतळामध्ये स्वयंचलित पद्धतीने वाहनांची ने-आण करण्याकरीता दोन मोठ्या लिफ्ट आहेत. या व्यतिरिक्त दोन शटल डिव्हाइस व दोन सिलोमेट डॉली आहेत. तसेच वाहन वळविण्यासाठी चार स्वयंचलित टर्न टेबल आहेत.  

 

टॅग्स :मुंबईपार्किंग