Join us

चालत्या बसमधील लुटारूना अटक

By admin | Updated: March 23, 2016 02:57 IST

चालत्या बसमध्ये वृद्ध इसमाला लुटणाऱ्या चौघा सराईत चोरट्यांना धारावी पोलिसांनी अटक केली. अब्दुल शेख, अमिन कुरेशी, फिरोज खान आणि युसूफ शेख अशी त्यांची नावे आहेत

मुंबई : चालत्या बसमध्ये वृद्ध इसमाला लुटणाऱ्या चौघा सराईत चोरट्यांना धारावी पोलिसांनी अटक केली. अब्दुल शेख, अमिन कुरेशी, फिरोज खान आणि युसूफ शेख अशी त्यांची नावे आहेत. धारावी परिसरातील पीएमजीपी कॉलनीत राहणारे वालजी जगदिया (वय ६१) हे सोमवारी सायनवरून १६५ या क्रमांकाच्या बेस्ट बसने धारावीला जात होते. त्यांच्या पाठीमागून चार सराईत पाकीटमार देखील बसमध्ये चढले. बस धारावी परिसरात पोहोचल्यानंतर चारही आरोपींनी त्यांच्या पिशवीवर ब्लेड मारले. हे लक्षात आल्यावर त्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे यातील दोन चोरांनी पळ काढला. बेस्ट चालकाने तत्काळ बस धारावी डेपोमध्ये नेली. धारावी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळावरून अब्दुल शेख आणि अमिन कुरेशी यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर पोलिसांनी रात्री १० वाजण्याच्या सुमारास यातील फिरोज खान आणि युसूफ शेख यांना सायन परिसरात सापळा रचून अटक केली. (प्रतिनिधी)