Join us  

निवडणुकीपूर्वी उडणार रस्ते कामांचा बार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 2:10 AM

बिगर शासकीय संस्थांच्या सर्वेक्षणात लोकप्रतिनिधींसाठी रस्ते दुरुस्ती व नामकरण हा जिव्हाळ्याचा विषय ठरला आहे.

मुंबई : बिगर शासकीय संस्थांच्या सर्वेक्षणात लोकप्रतिनिधींसाठी रस्ते दुरुस्ती व नामकरण हा जिव्हाळ्याचा विषय ठरला आहे. रस्त्यांवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होत असले तरी रस्त्यांची परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी रस्ते कामाचा बार उडविण्यात येणार आहे. तब्बल सव्वादोनशे कोटी रुपयांच्या कामाचे प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर एकाचवेळी मंजुरीसाठी मांडण्यात आले आहेत.मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा निर्धार महापालिका दरवर्षी करीत असते. त्याप्रमाणे मोठे पॅकेज रस्ते दुरुस्ती व रस्त्यांच्या कामासाठी जाहीर होते. या वर्षी तब्बल एक हजार रस्त्यांच्या कामाचे नियोजन करण्यात आले आहे. सन २०१८-२०१९ हे आर्थिक वर्ष संपण्यास दोन महिनेच उरले आहेत. तरी आतापर्यंत एकूण अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी केवळ ३७ टक्के रक्कम विकासकामांवर खर्च झाली आहे.या दोन महिन्यांत विकासकामे झपाट्याने उरकण्यात येणार आहेत. यामध्ये रस्त्यांच्या कामांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. पूर्व व पश्चिम उपनगरातील रस्ते दुरुस्ती, सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची डागडुजी, रस्त्यांची लवचीक फरसबंदी अशी कामे करण्यात येतील. या कामांच्या कंत्राटाची एकूण किंमत २२५ कोटी रुपये आहे.