Join us
Daily Top 2Weekly Top 5

पालिका निवडणुकीपूर्वी रस्ते चकाचक

By admin | Updated: January 26, 2016 02:10 IST

पावसाळ्यापूर्वी पूर्व उपनगरातील रस्ते वाहतुकीसाठी मोकळे करण्यासाठी चकाचक करण्यात येणार आहे़ या प्रकल्पांतर्गत भांडुप, मुलुंड, घाटकोपर, चेंबूर, कुर्ला, देवनार, मानखुर्द, गोवंडी

मुंबई : पावसाळ्यापूर्वी पूर्व उपनगरातील रस्ते वाहतुकीसाठी मोकळे करण्यासाठी चकाचक करण्यात येणार आहे़ या प्रकल्पांतर्गत भांडुप, मुलुंड, घाटकोपर, चेंबूर, कुर्ला, देवनार, मानखुर्द, गोवंडी अशा १२० रस्त्यांची सुमारे तीनशे कोटी रुपयांची कामे केली जाणार आहेत़ पालिकेच्या आगामी निवडणुकांमुळे बराच काळ रखडलेल्या पूर्व उपनगरातील रस्त्यांची कामे मार्गी लागणार आहेत़मुंबईतील रस्त्यांसाठी तीन वर्षांचा आराखडा तयार करण्यात आला आहे़ मात्र पूर्व उपनगरांतील रस्त्यांची कामे बराच काळ रेंगाळली होती़ त्यामुळे स्थानिक नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागत होता़ परंतु २०१७ मध्ये होणाऱ्या पालिका निवडणुकांमुळे अखेर या रस्त्यांकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष गेले आहे़ त्यानुसार निविदा प्रक्रिया पूर्ण करून पात्र ठेकेदारांची निवड करण्यात आली आहे़ घाटकोपरमधील २५ आणि चेंबूर, टिळकनगर येथील २२ असे एकूण ४७ रस्त्यांच्या कामाचे १०६ कोटींचे कंत्राट मेसर्स न्यू इंडिया रोडवेज ग्यान या संयुक्त कंपनीला देण्यात येणार आहे़ कुर्ला व मानखुर्द, गोवंडी, देवनार या भागांमधील सुमारे ५९ रस्त्यांचे ७० कोटींचे काम मे़ प्रकाश इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड इन्फ्राप्रोजेक्ट प्रा़ लि़ या कंपनीला देण्यात येणार आहे. मुलुंड आणि भांडुप येथील १० रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी मे़ नीव इन्फ्रास्ट्रक्चरला काम देण्यात येणार आहे़ घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड येथील छेडानगर जंक्शन ते शिवाजीनगर जंक्शनपर्यंत सिमेंट काँक्रिटीकरणासाठी मे़ जी़एल़ कन्स्ट्रक्शनला ५६ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात येणार आहे़ अशी सुमारे तीनशे कोटी रुपयांची कामे होणार आहेत़ (प्रतिनिधी)