Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या शहर भागातील रस्त्यांच्या कामाला अखेर गती! लवकरच निविदा उघडल्या जाणार

By जयंत होवाळ | Updated: May 7, 2024 19:58 IST

दोन कंत्राटदारांनी भरली निविदा

मुंबई: रखडल्या शहर भागातील रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामासाठी अखेर दोन कंत्राटदार पुढे आले असून लवकरच निविदा उघडल्या जाणार आहेत. त्यानंतर पात्र कंत्राटदाराची निवड होईल. मात्र प्रत्यक्ष कामांना पावसाळ्यानंतर , साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात सुरुवात होईल. पावसाळ्यात काँक्रिटीकरणाची कामे करू नयेत, असा स्पष्ट आदेश आयुक्तांनी दिला आहे.

वाद -विवाद आणि आरोप प्रत्यारोपांमुळे शहर भागातील रस्त्यांची कामे चर्चेत आली होती. या कामाची रखडपट्टी झाल्याने आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच निशाणा साधला होता. या कामाचे कंत्राट मे . रोडवे सोल्युशन इन्फ्रा प्रा.ली. या कंपनीला मिळाले होते. कार्यादेश मिळूनही कंत्राटदाराने वर्षभर कामाला सुरुवातच केली नव्हती. त्यामुळे बराच गदारोळ झाला होता. अखेर ६४ कोटी रुपयांचा दंड ठोठावत पालिकेने कंत्राटदाराचे कंत्राट रद्द केले. त्यानंतर पुन्हा निविदा मागवण्यात आल्या. मात्र स्पर्धात्मक निविदा न आल्यामुळे नव्याने निविदा काढण्याची वेळ आली होती. त्यानंतर रस्ते कामासाठी निविदा पूर्व बैठकीचे आयोजन करण्यात आले. मात्र या बैठकीस एकही कंपनी हजर राहिली नाही. परिणामी बैठक रद्द करावी लागली. मुंबईत सध्या ४०० रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे सुरु आहेत. पहिल्या टप्प्यात शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरातील काही कामे आहेत. या कामांसाठी ६०८० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

... म्हणून कंत्राटदार कचरत होतेरोडवे सोल्युशनला दंड ठोठावून त्यांच्याकडून कंत्राट काढून घेतल्यानंतर कंपनी पालिकेच्या विरोधात न्यायालयात गेली होती. न्यायालयात कंपनीच्या बाजूने निकाल लागल्यास आपले कंत्राट रद्द व्हायचे या भीतीने मध्यतंरी कोणीही कंत्राटदार निविदा भरण्यासाठी पुढे येत नव्हते.

टॅग्स :मुंबई