Join us  

चोरीच्या मोहाने गाठला कोठडीचा रस्ता, वृद्धेच्या लुटीचे गूढ उलगडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 4:45 AM

हाती लाखोंचे घबाड लागले. ते पाहून चोराची नियत फिरली. एरवी एका चोरीनंतर सहा महिने पसार होणाऱ्या या चोराने जास्तीच्या मोहात पुन्हा त्याच ठिकाणी चोरीसाठी सावजाचा शोध सुरू केला; आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याचा प्रकार पायधुनीत उघडकीस आला.

मुंबई  - हाती लाखोंचे घबाड लागले. ते पाहून चोराची नियत फिरली. एरवी एका चोरीनंतर सहा महिने पसार होणाऱ्या या चोराने जास्तीच्या मोहात पुन्हा त्याच ठिकाणी चोरीसाठी सावजाचा शोध सुरू केला; आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याचा प्रकार पायधुनीत उघडकीस आला. वसीम अब्दुल शेख (२७) असे चोराचे नाव असून पायधुनी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.परळ परिसरात ६८ वर्षांच्या पवनबेन जयंतीलाल फागनीया या कुटुंबीयांसोबत राहतात. २६ जून रोजी त्या दागिने खरेदीसाठी झवेरी बाजारात गेल्या. तेथे त्यांनी ९३ गॅ्रम सोन्याचे दागिने बनविले आणि त्या घरी जाण्यासाठी निघाल्या. त्या मुंबादेवी येथे बसची वाट पाहत थांबल्या. बस येताच त्यांच्या मागे असलेल्या शेखने त्यांना धक्का दिला आणि उलट त्यांनाच, माँजी धक्का मत दिजीये असे बोलू लागला. त्यांनी त्याची माफी मागताच, त्याने त्यांना बोलण्यात गुंतविले आणि त्यांच्या पाकिटातील दागिन्यांची पर्स लंपास करून तो पसार झाला. फागनीया यांनी घर गाठले. दागिने पाहण्यासाठी पाकीट उघडले तेव्हा दागिने गायब असल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ पायधुनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून चोरीचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी शोध सुरू केला.दुसरीकडे शेखने घरी जाऊन पर्स उघडली. आतापर्यंतच्या चोरीत मोठे घबाड हाती लागले म्हणून त्याची नियत फिरली. अच्छे दिनला सुरुवात झाली म्हणत त्याने धाडसाने पुन्हा त्याच ठिकाणी चोरी करण्याचा निर्णय घेतला आणि असे काही सावज हाती लागताच, वर्षभर आराम करायचा या विचाराने तो स्वप्न रंगवू लागला. घटनेच्या आठवड्याभराने ३ जुलै रोजी त्याने पुन्हा त्याच ठिकाणी सावजाचा शोध सुरू केला.पायधुनी पोलिसांचे तपास पथकही येथे सर्व बाजूने आरोपीचा शोध घेत होते. याच दरम्यान शेखच्या संशयास्पद हालचालींबाबत खबºयांकडून माहिती मिळाली आणि तपास पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून शेखला ताब्यात घेतले.सुरुवातीला त्याने गुन्ह्यांची कबुली देण्यास नकार दिला. पोलीस खाक्या दाखवताच त्याने चोरी केल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्याच्याकडे केलेल्या सखोल तपासाअंती अखेर दोन दिवसाने त्याने तोंड उघडले. त्याच्या चेंबूरच्या चित्ता कॅम्प येथील घरातून ९३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत गेले. येथे तो भाड्याने राहतो.या पथकाची कामगिरी...पायधुनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लीलाधर पाटील, प्रवीण फडतरे आणि पोलीस अंमलदार सदानंद सोलकर, धोंडीराम माने, शिरीष सावंत, श्रीकष्ण दळवी, शशिकांत खैदतोडे, विजय शिंदे या पथकाने शिताफीने ही कामगिरी पार पाडली.वृद्ध प्रवासी टार्गेटवरशेख याच्या टार्गेटवर वृद्ध प्रवासी होते. त्याने आतापर्यंत अनेकांची अशा प्रकारे लूट केल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :गुन्हा