Join us

रस्ते घोटाळ्याचा अहवाल गुलदस्त्यात

By admin | Updated: April 22, 2016 02:23 IST

रस्ते घोटाळ्याची चौकशी महापौरांच्या मागणीनुसार प्रशासनाने सुरू केली खरी़, मात्र अहवाल सादर करण्यास टाळाटाळ होत असल्याची तीव्र नाराजी सर्वपक्षीय नगरसेवकांनी गुरुवारी व्यक्त केली़

मुंबई : रस्ते घोटाळ्याची चौकशी महापौरांच्या मागणीनुसार प्रशासनाने सुरू केली खरी़, मात्र अहवाल सादर करण्यास टाळाटाळ होत असल्याची तीव्र नाराजी सर्वपक्षीय नगरसेवकांनी गुरुवारी व्यक्त केली़ प्रशासनाच्या या कारभाराच्या निषेधार्थ पालिकेची महासभा कोणतेही कामकाज न करता तहकूब करण्यात आली़रस्त्यांच्या कामामधील अनियमिततेची चौकशी करण्याची मागणी महापौर स्नेहल आंबेकर यांनी पत्राद्वारे आयुक्त अजय मेहता यांच्याकडे केली होती़ त्यानुसार अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांच्या समितीने चौकशी करून अहवाल तयार केला़ हा अहवाल स्थायी समितीच्या बैठकीत सादर होणार होता़ मात्र प्रशासनाने अद्याप अहवाल दिलेला नाही़ या प्रकरणी स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करीत प्रशासनावर कोणाचा दबाव आहे, असा सवाल पालिका महासभेत केला़रस्ते घोटाळ्याचा आरोप असलेल्या अभियंत्यांना प्रशासनाने घरी बसविले़ मात्र ठेकेदारांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी केला़ तरीही आयुक्त याबाबत खुलासा करण्यासाठी सभागृहात आले नाहीत़ या निषेधार्थ कोणतेही कामकाज न करता पालिकेची महासभा तहकूब करण्यात आली़ (प्रतिनिधी)