मुंबई : ऐन पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डे अथवा नादुरुस्त रस्त्यांमुळे मुंबईकरांचा रोष पत्करावा लागू नये म्हणून मुंबई महापालिका प्रशासन रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी चांगलेच हातीघाईवर आले आहे. दस्तुरखुद्द महापौर सुनील प्रभू स्वत: रस्ते दुरुस्तीवरील कामांवर देखरेख ठेवण्यासाठी रस्त्यांवर उतरले आहेत. शिवाय ही कामे २५ मेपर्यंत पूर्ण करण्यात यावी, असे निर्देशदेखील देण्यात आले आहेत. प्रत्यक्षात मात्र सद्यस्थिती पाहता मुंबई शहर आणि उपनगरातील रस्ते पावसाळ्यापूर्वी दुरुस्त होण्याची चिन्हे दिसत नसल्याचे चित्र स्पष्ट आहे. दरवर्षीच्या पावसाळ्यात मुंबई शहर आणि उपनगरातील रस्त्यांवर खड्डे पडण्याचे प्रमाण मोठे आहे. हे खड्डे बुजविण्यात येत असल्याचा गवगवा पालिका करत असली तरी प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळे असते. पावसाळा उलटून गेला तरी रस्त्यांवरील खड्डे कायम असतात. आणि मुंबईकरांची त्यामुळे होणारी दैना वेगळीच असते. यावर यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांचा रोष ओढवू नये, म्हणून मुंबई महानगर पालिका प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रस्ते दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रस्ते दुरुस्तीची कामे तब्बल दहा महिने सुरु राहणार आहेत. परिणामी मुंबईकरांना पावसाळ्यासह नंतरही नादुरुस्त रस्त्यांचा जाच सहन करावा लागणार आहे. पावसाळा संपल्यानंतर पुन्हा रस्त्याचे काम हाती घेतले जाणार आहे. दरम्यान, खड्डे दुरुस्तीचा खर्च स्वत:च्या अंगावर येऊ नये म्हणून पावसाळ्यात रस्त्यांवर पडणार्या खड्ड्यांची जबाबदारी कंत्राटदारांवर सोपविण्यात आली आहे. शिवाय कंत्राटदारांनी वेळेत खड्ड्यांची दुरुस्ती केली नाही तर कंत्राटदारांकडून दंड वसूल केला जाणार आहे. (प्रतिनिधी)
रस्ते दुरुस्ती हातघाईवर
By admin | Updated: May 13, 2014 05:28 IST