Join us  

बाप्पाच्या दर्शनाच्या गर्दीने फुलले मुंबईचे रस्ते

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 6:07 AM

बाप्पाला निरोप देण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत.

मुंबई : बाप्पाला निरोप देण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळेच गुरुवारी गणेशभक्तांनी सार्वजनिक बाप्पाच्या दर्शनासाठी ठिकठिकाणी अलोट गर्दी केल्याचे चित्र होते. मोहरमनिमित्त सुट्टी असल्याने गुरुवारी सकाळपासून लालबाग, परळ, खेतवाडीच्या गल्ल्यांमध्ये गणेशभक्तांनी दर्शनासाठी भल्या मोठ्या रांगा लावल्या होत्या. दक्षिण मुंबईतील मानाच्या समजल्या जाणाऱ्या लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातील नागरिक तासन्तास ताटकळत उभे होते. याशिवाय, गिरणगावातील जत्रांमध्येही भाविक सहभागी झाले. वीकेन्डलाही मुंबापुरीच्या रस्त्यांवर लाडक्या ‘श्रीं’च्या दर्शनासाठी भक्तांचा सागर उसळलेला दिसून येईल.दीड, पाच वा सात दिवसांच्या घरगुती बाप्पांना निरोप देऊन मुंबईकरांसह राज्याच्या विविध भागांतील नागरिकांची सार्वजनिक बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी मंडळाच्या मंडपांबाहेर रांग लागली आहे. राज्यभरात मुंबईतील गणेशोत्सव हा देशभरातील आकर्षणाचा केंद्रबिंदू मानला जातो. गणेशोत्सवाकडे असणारा भक्तांचा ओढा पाहून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने बाप्पांचे दर्शन देण्यासाठी विशेष टूरचेही आयोजन केले होते, या उपक्रमात अनेक परदेशी नागरिकांनीही सहभाग घेत मुंबईतील प्रसिद्ध मंडळांच्या बाप्पांचे दर्शन घेतले.गुरुवारी सकाळपासून शहर-उपनगरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गर्दी दिसली. त्यात गिरणगावातील चिंचपोकळीचा चिंतामणी, गणेशल्लीचा राजा, काळाचौकीचा महागणपती, रंगारी बदक चाळीचा गणपती, तेजुकायाचा गणपती, नरेपार्कचा बाप्पा या मंडळांच्या बाप्पाच्या दर्शनासाठी बरीच रांग होती.याशिवाय, खेतवाडीच्या१३ गल्ल्यांतील विविधरूपी गणेशमूर्ती आणि देखावेही लक्षवेधी ठरत असल्याने येथेही भाविकांनी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्याचप्रमाणे, पूर्व, पश्चिम येथील उपनगरातील अंधेरीचा राजा, चेंबूर येथील सह्याद्री क्रीडा मंडळ, विलेपार्लेचा पेशवा या मंडळांच्या बाप्पांचे दर्शन घेण्यासाठीही भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.>क्लिकक्लिकाट..!सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपात बाप्पाचे साजेसे रूप आपल्या डोळ्यात साठवताना भाविक दिसून येतात. मात्र ‘जळी-स्थळी’ या उत्सवनगरीत प्रत्येक भाविक बाप्पाची छबी आपल्या मोबाइल कॅमेºयात बंदिस्त करताना दिसून येतात. याशिवाय, गणेशोत्सवादरम्यान नवोदित छायाचित्रकारांचाही उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे. बाप्पाचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्यात येत आहेत. सोशल मीडियामुळे बाप्पा ‘ग्लोबल’ होत आहे.

टॅग्स :गणेश चतुर्थी २०१८गणेशोत्सव