Join us

पेव्हर ब्लॉकमुळे चेंबूरमधील रस्त्यांची दुर्दशा

By admin | Updated: March 30, 2015 00:31 IST

सध्या शहरातील रस्त्यांसाठी वापरले जाणारे पेव्हर ब्लॉक हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे असताना देखील पालिका याच पेव्हर ब्लॉकचा वापर केला जात आहे.

चेंबूर : सध्या शहरातील रस्त्यांसाठी वापरले जाणारे पेव्हर ब्लॉक हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे असताना देखील पालिका याच पेव्हर ब्लॉकचा वापर केला जात आहे. त्यामुळे चेंबूरमधील गडकरी खाण परिसरात देखील अशाच प्रकारे संपूर्ण रस्त्याला पेव्हर ब्लॉक लावण्यात आले आहेत. त्यामुळे वर्षभरातच या रस्त्यांची अक्षरश: दुर्दशा झाली आहे. त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या रहिवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.गेल्या ५ वर्षांपासून चेंबूरच्या आर.सी. मार्गावर मोनो रेल्वेचे काम सुरु होते. सध्या मोनो प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन मोनो लोकांच्या सेवेत हजर झाली. मात्र गेल्या पाच वर्षांपासून या मार्गावरील फुटपाथांसोबत रस्त्यांंची देखील मोठी दुरवस्था झाली होती. मोनोचे पिलर उभे करण्यासाठी रस्त्याच्या मधोमध मोठ्या प्रमाणात खोदकाम करुन त्यावर पिलर उभे करण्यात आले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते खराब झाले. परिणामी चेंबूरमधील आर.सी. मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी अद्यापही सुरुच आहे. त्यातच अनेक रस्त्यांवर पेव्हर ब्लॉक बसवल्याने वर्षभरातच हे ब्लॉक उखडत आहेत.चेंबूरच्या गडकरी खाण परिसरात एचपीसीएल, पेप्सी आणि काही डांबरच्या कंपन्या आहेत. त्यामुळे या मार्गावर नेहमी अवजड वाहनांची ये-जा सुरु असते. परिणामी येथील रस्त्यांची गेल्या काही वर्षांत मोठी दुरावस्था झाली होती. त्यामुळे वर्षभरापूर्वीच पालिकेने येथील रस्ते दुरुस्त केले. मात्र हे रस्ते सिमेंटचे न बनवता याठिकाणी केवळ पेव्हर ब्लॉक लावण्यात आले. हे पेवर ब्लॉकसुध्दा अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने वर्षभरातच या रस्त्यांची संपूर्ण चाळण झाली आहे. रस्त्यांवरील या खड्ड्यांमुळे गेल्या काही दिवसांत परिसरात अनेक अपघात झालेत. या मर्गावर नेहमीच अवजड वाहनांची ये-जा असते. याची पुरेपूर कल्पना पालिका अधिकाऱ्यांना आहे. मात्र तरीदेखील या रस्त्यांवर पेव्हर ब्लॉक टाकण्यात आल्याने गरिबांचा पैसा शासन जाणून-बुजून कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या घशात घालत असल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात येत आहे. याबाबत परिसरातील मनसे कार्यकर्ते प्रकाश जाधव आणि दयानंद पुजारी यांनी तक्रारी केल्या. मात्र पालिका अधिकाऱ्यांकडून या समस्येकडे नेहमीच दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पालिकेने तत्काळ याची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)