दिवसाला ७ ते ९ वाहने जाताहेत चोरीला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - लॉकडाऊनच्या काळात ‘लॉक’ झालेली रस्त्यावरील गुन्हेगारी पुन्हा ‘अनलॉक’ झाल्याने पोलिसांच्या डोकेदुखीत भर पडली आहे. गेल्या आठ महिन्यात मुंबईतून दोन हजार दोनशे वाहने चोरीला गेली आहेत. यातील अवघ्या ९४० वाहनांचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले आहे. यात दिवसाला ७ ते ९ वाहने चोरीला जात आहेत.
गेल्या ८ महिन्यात मुंबईत एकूण ५२ हजार ५७९ गुन्हे नोंद झाले. लॉकडाऊनचे सुरुवातीचे मुख्यत्वे करून एप्रिल आणि मे महिन्यात शहरातील गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात घट झाली. मात्र, गेल्या वर्षी जून महिन्यात अनलॉकचा टप्पा सुरू होताच जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये गुन्ह्यांचे प्रमाण पुन्हा जैसे थे स्वरूपात आले. यात वाहन चोरीत वाढ झाली आहे.
गेल्या ८ महिन्यात वाहन चोरीचे २ हजार १९९ गुन्हे पोलीस दफ्तरी नोंद झाले आहे. यापैकी अवघ्या ९४० वाहनांचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात ५९० ने वाढ झाली आहे. या वाहनात दुचाकीचे प्रमाण अधिक असून, दिवसाला ७ ते ९ वाहने चोरीला जात असल्याने मुंबईकरांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे.
भंगारात पार्टची विक्री, तर कुठे बनावट क्रमांकाच्या आधारे विक्री
रस्त्यालगत उभ्या असलेल्या दुचाकी चोरून काही टोळी त्या गाड्यांचे पार्ट मुंबईसह मुंबईबाहेर विक्री करतात. मुंबईतही बरेच गॅरेजमध्ये याची कमी भावात खरेदी करतात. तर काही जण त्यांना भंगारातील दुचाकींचे इंजिन नंबर लावत त्यांची विक्री करतात. भंगारामध्ये निघणाऱ्या दुचाकी दोन ते पाच हजारामध्ये कागदपत्रांसह ग्राहकांकडून खरेदी करायचे. त्यानंतर त्याच बनावटीची दुचाकी शोधून त्या दुचाकीची चोरी करायचे. अशा टोळ्यांवर मुंबई पोलिसांकड़ून वेळोवेळी कारवाई करण्यात येत आहे. तर काही ठग बनावट क्रमांक लावून या दुचाकीची सोशल मीडियावरदेखील विक्री करताना दिसून आले.
९४० गुन्ह्यांची उकल
मुंबईत आतापर्यंत दाखल झलेल्या वाहन चोरीच्या घटनांपैकी ९४० गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना यश आले आहे. यात आतापर्यंत वेगवेगळ्या टोळ्यांंची, चोरांची पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे.
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
रस्त्यावरील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांकड़ून गस्त वाढविण्यात आली आहे. तसेच सर्व आस्थापनाबाहेर सीसीटीव्ही लावण्याचे आदेश पोलिसांकड़ून देण्यात आले आहे. जेणेकरून गुन्ह्यांची उकल होण्यास मदत होईल. तसेच नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन मुंबई पोलिसांकड़ून करण्यात येत आहे.