मुंबई : मुंबई पावसाने शुक्रवारी दमदार हजेरी लावल्याने एकीकडे रेल्वे रुळात पाणी साचले रेल्वे वाहतूक मंदावली, तर रस्त्यात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीचा खोळंबा झाला.
सायन-कुर्ला, टिळकनगर, विद्याविहार, चुनाभट्टी स्थानकातील रेल्वे रूळ पाण्याखाली गेले होते. यामुळे मुख्य मार्गावरील जलद-धिम्या आणि हार्बर लोकलवर परिणाम झाल्याने २५ ते ३० मिनिटे लोकल विलंबाने धावत होत्या, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
पाऊस थांबल्यावर पाणी ओसरण्यास सुरुवात झाली दुपारी १ वाजण्याच्या सुमारास सर्व रेल्वे वाहतूक सुरू झाल्याचा दावा रेल्वे अधिकाऱ्यांनी केला. मात्र, समाजमाध्यमांवर दुपारपर्यंत लोकल नसणे, विलंबाने गाडी येणे, धिम्या-जलद मार्गावरील वेळापत्रक कोलमडल्याच्याच पोस्ट फिरत होत्या.
तर लोकलवर अवलंबून असलेले लाखो नागरिक रस्तेमार्गे कार्यालय गाठत आहेत. चेंबूर, सांताक्रुझ, विलेपार्ले, कुर्ला, गोरेगाव, दहिसरमधील रस्त्यांसह गुडघाभर पाणी साचले. अनेक वाहन चालक रस्त्यावरच गाडी लावून पाणी ओसरण्याची वाट पाहत होते.
एलबीएस मार्ग, पूर्व द्रुतगती आणि पश्चिम द्रुतगती महामार्गासह चेंबूर लिंक रोड, चुनाभट्टी-बीकेसी रोड, अंधेरी लिंक रोड या सर्वच ठिकाणी वाहतुकीचा वेग खूपच मंदावला होता. यामुळे सामान्य नागरिकांना प्रचंड वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पाणी ओसरले आणि मुंबईकरांचा रस्ते प्रवास हळूहळू सुरू झाला होता.
१० मिनिटांच्या प्रवासाला ३५ ते ४० मिनिटे
पाऊस थांबल्यानंतर एकामागोमाग एक लोकल उभ्या असल्याने, अनेक फेऱ्या विलंबाने धावत होत्या. दुपारी दादर ते भायखळा हे १० मिनिटांचे रेल्वे अंतर पार करण्यासाठी सुमारे ३५ ते ४० मिनिटांचा वेळ लागत होता. गर्दीच्या वेळेतच लोकल वेळापत्रक कोलमडल्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कामावर शुक्रवारी लेटमार्क ही सहन करावा लागला.