मुंबई : १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी १० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या रियाज सिद्दिकीला मंगळवारी विशेष टाडा न्यायालयाने विकासक प्रदीप जैन हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. याच केसमध्ये यापूर्वी अबू सालेम व त्याचा ड्रायव्हर मेहंदी हसन यांनाही जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.३१ आॅगस्ट रोजी टाडा न्यायालयाने सिद्दिकीला प्रदीप जैन यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवले. त्यानंतर विशेष सरकारी वकिलांनी त्याने केलेला गुन्हा दुर्मीळ नसल्याचे म्हणत त्याला जन्पठेप ठोठावण्याची विनंती न्या. जी.ए. सानप यांना केली.अबू सालेम व कुप्रसिद्ध डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ अनिस इब्राहिम यांच्यासाठी सिद्दिकीने मध्यस्थीचे काम केले. या दोघांनाही जैनची मालमत्ता विकत घ्यायची होती. मात्र जैन यांनी त्या मालमत्तेवरून अधिकार सोडण्यास नकार दिल्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. त्यामुळे सिद्दिकीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली तरच न्याय मिळेल, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकिलांनी केला.७ मार्च १९९५ रोजी प्रदीप जैन यांची हत्या त्यांच्या जुहू येथील कार्यालयाबाहेर करण्यात आली. या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार प्रदीप जैन यांचे भाऊ सुनील जैन होते. त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला. मात्र ते या हल्ल्यातून बचावले. जैन यांची बंदुकीच्या १७ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.स्वतंत्रपणे चालविला खटला२०१५ मध्ये विशेष टाडा न्यायालयाने पोर्तुगालमधून प्रत्यार्पण केलेल्या अबू सालेमसह त्याचा ड्रायव्हर मेहंदी हसन याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सिद्दिकी या प्रकरणी ‘माफीचा साक्षीदार’ झाला होता. त्यामुळे तो तात्पुरता बचावला होता. मात्र काही दिवसांनी त्याने दिलेला जबाब मागे घेतला. त्यामुळे सरकारी वकिलांनी त्याला फितूर म्हणून जाहीर केले. या कारणास्तव सिद्दिकीवरील खटला स्वतंत्रपणे चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार या खटल्यात मंगळवारी विशेष टाडा न्यायालयाने विकासक प्रदीप जैन हत्येप्रकरणी रियाज सिद्दिकीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
रियाज सिद्दिकीला जन्मठेपेची शिक्षा, प्रदीप जैन हत्याप्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 05:18 IST