Join us

रिया सेनने केली होती प्रशंसा!

By admin | Updated: April 14, 2015 01:56 IST

‘शेम आॅन कंट्री’ अशा शब्दांत अग्निशमन दलाच्या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त करणाऱ्या बॉलीवूड अभिनेत्री रिया सेनने घटनास्थळावर मात्र आमची प्रशंसाच केली होती,

मुंबई : ‘शेम आॅन कंट्री’ अशा शब्दांत अग्निशमन दलाच्या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त करणाऱ्या बॉलीवूड अभिनेत्री रिया सेनने घटनास्थळावर मात्र आमची प्रशंसाच केली होती, असे अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. रियाने सोशल साईटवर अशा प्रकारचे भाष्य केल्याबाबत विचारणा केली असता, या अधिकाऱ्यांनी भुवया उंचावल्या.अंधेरी पश्चिम परिसरात रु ईया पार्कमध्ये असलेल्या सात मजली इमारतीमध्ये तृणमूल काँग्रेसच्या खासदार मून मून सेन त्यांच्या मुलीसोबत राहतात. रविवारी सकाळी एसीचा स्फोट होऊन त्यांच्या सहाव्या मजल्यावरील घराला आग लागली. या प्रकरणी ट्विटरवर रियाने ‘शेम आॅन कंट्री’ असे ट्विट केले. मात्र प्रत्यक्षात तिच्या घरच्यांना वाचवत वित्तहानी टाळल्याने त्यांनी घटनास्थळी आमची प्रशंसा केली, असे सहायक विभागीय अग्निशमन आणि या प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी व्ही.के. घोष यांनी ‘लोकमत’ला सांगितले. या ठिकाणचा चिंचोळा रस्ता आणि दोन्ही बाजूंना गाड्यांचे पार्किंग यामुळे थोडे अडथळे आले. मात्र त्यावरही मात करीत आमच्या जवानांनी प्रशंसनीय काम केल्याचेही ते म्हणाले. आम्ही उशिरा पोहोचल्याचे कोणी म्हणत असेल, तर मी स्वत: त्या ठिकाणी कांदिवली परिसरातून जुहूपर्यंत २० मिनिटांमध्ये पोहोचलो. तर अंधेरी अग्निशमन दलाला पोहोचण्यात निव्वळ १० मिनिटे लागली असावी. कारण रविवारी रस्त्यावर फारशी रहदारीही नव्हती, असेही त्यांनी नमूद केले. या प्रकरणी सेन कुटुंबीयांचे जबाब नोंदविण्याचे काम अद्याप बाकी आहे. त्यामुळे लवकरच हे जबाबही नोंदविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)