Join us
Daily Top 2Weekly Top 5

एकाच पक्षातून उमेदवारीसाठी काका-पुतण्यामध्ये चढाओढ

By admin | Updated: January 29, 2017 03:32 IST

आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांची उमेदवारी मिळविण्यासाठी लगीनघाई सुरू आहे. काही ठिकाणी तर नातेवाइकांनीही एकाच पक्षातून

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांची उमेदवारी मिळविण्यासाठी लगीनघाई सुरू आहे. काही ठिकाणी तर नातेवाइकांनीही एकाच पक्षातून उमेदवारी मिळविण्यासाठी धडपड सुरू केली आहे. असेच काहीसे चित्र डी विभागातील प्रभाग क्रमांक २१४ मध्ये दिसून येत आहे.डी विभागातील प्रभाग क्रमांक २१४ मध्ये मनसेमधून उमेदवारी मिळविण्यासाठी एकाच कुटुंबातील काका आणि पुतण्यामध्ये अटीतटीचा सामना रंगला आहे. या दोघांनीही आपापल्या पद्धतीने प्रचाराला सुरुवात केली असून, पक्षश्रेष्ठींच्या मनधरणीसाठी दोघे प्रयत्न करीत आहेत. दीपक मेस्त्री आणि डॉ. रितेश मेस्त्री यांच्यात उमेदवारी मिळविण्यासाठी चुरस रंगताना दिसते आहे. इच्छुकांच्या प्रयत्नांनंतरही स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून इच्छुकांविषयीचे मत जाणून घेतल्यानंतरच, उमेदवारी देण्यात येणार असल्याचे मत मनसेचे विभाग अध्यक्ष धनराज नाईक यांनी सांगितले.प्रभाग फेररचनेनंतर डी विभागात मतदारांची संख्या वाढली आहे, या प्रभागात जवळपास ६० हजार मतदार आहेत. येथील २१४ प्रभागात सध्या भारतीय जनता पार्टीच्या सविता पाटील या विद्यमान नगरसेविका आहेत. मात्र, आता या प्रभागाचे खुल्या गटात आरक्षण झाले आहे. त्यामुळे सर्वच पक्षांतील इच्छुक जोरदार फिल्डिंग लावत आहेत. गोवालिया टँक, जनतानगर, महालक्ष्मी मंदिर, जसलोक रुग्णालय, ताडदेव या परिसरात प्रभागाची व्याप्ती आहे. (प्रतिनिधी)