Join us
Daily Top 2Weekly Top 5

जीर्ण वीज वाहिन्यांमुळे जीवास धोका

By admin | Updated: May 7, 2015 23:31 IST

महाड तालुक्यातील बिरवाडी आणि परिसरात विद्युत तारा तुटण्याचे प्रमाण वाढले असून त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.

बिरवाडी : महाड तालुक्यातील बिरवाडी आणि परिसरात विद्युत तारा तुटण्याचे प्रमाण वाढले असून त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.विद्युत पोल तसेच विद्युत तारा कालबाह्य झाल्याने वारंवार तुटून रहदारीच्या रस्त्यावर पडत आहे. त्यामुळे या ठिकाणावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. धोकादायक विद्युत पोल तातडीने बदलण्यासंदर्भात नागरिकांनी वारंवार विद्युत वितरणला लेखी निवेदन दिले आहे. काही दिवसांपूर्वी परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे जीर्ण विद्युत खांब आणि वाहिन्या न बदलल्याने पावसाळ्यापूर्वी सुटणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे त्या तुटून पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बिरवाडी गं. द. आंबेकर हायस्कूलजवळ चालू अवस्थेतील विद्युत तार पडल्याने या ठिकाणी एका भंगार वेचणाऱ्या कामगाराला विद्युत झटका लागल्याची घटना बुधवारी घडली होती. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन झालेल्या घटनेची माहिती विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कळविली. मात्र कर्मचारी उपलब्ध होऊ न शकल्याने वीजप्रवाह सुरूच ठेवण्यात आला होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून या वीज वाहिन्या लवकरात लवकर न बदलल्यास जीवितहानी होण्याची शक्यता नागरिकांनी वर्तवली आहे. (वार्ताहर)