Join us
Daily Top 2Weekly Top 5

आजारांचा धोका वाढला

By admin | Updated: June 24, 2015 05:02 IST

दोन ते तीन दिवसांपासून मुंबईत होत असलेल्या मुसळधार पावसाने मुंबईकर सुखावले आहेत. वीकेण्डला आलेला पाऊस मुंबईकरांनी पुरेपूर एन्जॉय केला.

मुंबई : दोन ते तीन दिवसांपासून मुंबईत होत असलेल्या मुसळधार पावसाने मुंबईकर सुखावले आहेत. वीकेण्डला आलेला पाऊस मुंबईकरांनी पुरेपूर एन्जॉय केला. पण, याच पावसाबरोबर येणाऱ्या आजारांना मुंबईकरांनी विसरता कामा नये. गेल्या वर्षी डेंग्यूने मुंबईत चांगलेच डोके वर काढले होते. पावसाच्या सुरुवातीच्या काळात दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचा धोका अधिक असतो, यामुळे मुंबईकरांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला डॉक्टर देत आहेत. पावसात भिजणे, उघड्यावरचे अन्नपदार्थ खाणे याच कारणांमुळे पावसाळ्यातील आजार बळावतात. पावसात भिजताना मजा वाटत असली, तरीही नंतर डोकेदुखी, सर्दी, खोकला, ताप असा त्रास जाणवू लागतो. रोगप्रतिकारकशक्ती कमी असल्यास तापामुळे पुढे गुंतागुंत वाढू शकते. पावसाळ्यात प्रामुख्याने अशुद्ध पाण्यातून होणारा संसर्ग आणि डासांमुळे आजार बळावतात.पावसाच्या सुरुवातीच्या काळात येणारे गढूळ पाणी आरोग्यास अत्यंत हानिकारक आहे. पाण्यातील जंतू पोटात गेल्यास कावीळ, टायफॉइड यासारखे आजार बळावतात. एखाद्या व्यक्तीच्या पायाला जखम झाली असल्यास त्यांनी पावसाळ्यात विशेष काळजी घेणे गरजेचे ठरते. साचलेल्या पाण्यात संसर्गाचा धोका असतो. यामुळे लेप्टोस्पायरोसिस होण्याचा धोका बळावतो. मधुमेही व्यक्तींनी अधिक काळजी घ्यावी, असा सल्ला इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. जयेश लेले यांनी दिला. (प्रतिनिधी)