Join us  

३० पेक्षा कमी वय असणाऱ्यांना धोका अधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2021 2:56 AM

तिसऱ्या लाटेबाबत टास्क फोर्सचे निरीक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सध्या राज्यासह मुंबईत कोरोनाची दुसरी लाट स्थिरावली आहे. मात्र या लाटेनंतर तिसऱ्या कोरोना लाटेचा धोका कायम आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ४० ते ६० वयोगटातील व्यक्तींना अधिक प्रमाणात संसर्ग झाला. अजूनही कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा धोका कायम असून, यात ३० पेक्षा कमी वय असणाऱ्यांना अधिक धोका आहे, तसेच मृत्यूचे प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी बाळगून लसीकरण मोहिमेला गती देण्याची गरज असल्याचे निरीक्षण राज्याच्या कोरोना टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविले आहे.

मुंबई महापालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, १ एप्रिल ते २ मेदरम्यान शहर, उपनगरातील एक हजार ५८१ कोरोना रुग्णांचा मृत्यू ओढावला आहे. यातील ४६४ रुग्ण हे ४० ते ६० वयोगटातील आहेत. याविषयी, राज्याच्या कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा तरुणांमध्ये संसर्गाचे प्रमाण जास्त आहे. आता तरी खबरदारी घेऊन या वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण करणे गरजेचे आहे. तरुण बाधितांच्या मृत्यूंमध्ये मधुमेह, श्वसनविकार, ह्रदयविकार ही कारणे आहेत.

विषाणूतील बदलांवरही अभ्यास होणे आवश्यकराज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे तज्ज्ञ डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, तिसऱ्या लाटेचा धोका असेल किंवा नसेलही. परंतु, आपण त्यासाठी संपूर्णतः खबरदारी बाळगली पाहिजे, आपण कोरोनाविरोधात लढण्यास सक्षम असायला पाहिजे. त्याचप्रमाणे कोरोना विषाणूतील बदलांवरही अभ्यास होणे गरजेचे आहे. गेल्या लाटेमध्ये ज्येष्ठ नागरिकांमध्ये संसर्ग अधिक असल्याचे चित्र हाेते. आता दुसऱ्या लाटेत तरुणांमध्ये संसर्ग अधिक असल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे आता तिसऱ्या संभाव्य लाटेत लहानग्यांच्या दृष्टीने यंत्रणा सक्षम व्हायला हवी. आपण त्या दृष्टिकोनातून आतापासून प्रयत्न करायला हवा.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लस