Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकरांना ‘ई कोलाय’चा धोका

By admin | Updated: August 26, 2015 04:14 IST

पावसाळ्यात दूषित, गढूळ पाण्यामुळे आजारी पडण्याचा धोका अधिक असतो. हे टाळण्यासाठी अनेक जण पाणी उकळून, गाळून पितात. तरीही काही जण आजारी पडतात.

मुंबई : पावसाळ्यात दूषित, गढूळ पाण्यामुळे आजारी पडण्याचा धोका अधिक असतो. हे टाळण्यासाठी अनेक जण पाणी उकळून, गाळून पितात. तरीही काही जण आजारी पडतात. कारण, मुंबईतील पाण्यात ‘ई कोलाय’ जीवाणू आढळून येत असल्याचे तीन महिन्यांच्या पाणी तपासणी अहवालातून स्पष्ट झाले आहे.मुंबईत पालिकेतर्फे होणाऱ्या पाणीपुरवठ्यापैकी ८ टक्के पाणी दूषित असून त्यापैकी २ टक्के पाण्यात ई कोलायचे जीवाणू आढळून आले आहेत. महापालिकेच्या पाणी तपासणी अहवालातून ही माहिती स्पष्ट झाली आहे. दर महिन्याला वॉर्डनिहाय पाण्याचे नमुने गोळा केले जातात. या नमुन्यांची तपासणी जी-उत्तर कार्यालयाच्या प्रयोगशाळेत केली जाते. मुंबईकर अशाप्रकारे दूषित पाणी प्यायल्यास ते आजारी पडण्याचा धोका वाढतो, असे मत माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी व्यक्त केले. दूषित पाणी प्यायल्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. पोटात दुखणे, हगवण लागणे, पोटात संसर्ग होणे, गॅस्ट्रो, काविळीसारखे आजार हे दूषित पाण्यामुळे होण्याचा धोका अधिक असतो. मुंबईकर पित असलेल्या पाण्यात ई कोलाय जीवाणू आढळून आले आहेत. रस्त्यावरील अनेक खाद्यपदार्थ विक्रेते विहिरीचे पाणी वापरतात. त्याचबरोबर काही ठिकाणी पिण्यासाठी वापरले जाणारे पाणीही विहिरीचे असते. अशा पाण्यापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास हे जीवाणू पोटात जाऊन आजारी पडण्याचा धोका वाढतो, असे राऊळ यांनी सांगितले. पावसाळ्यात होणाऱ्या आजारांमध्ये मलेरिया, डेंग्यू, यंदा वाढलेल्या स्वाइन फ्लूकडे अधिक लक्ष दिले जाते. पण दूषित पाण्यामुळे होणाऱ्या कावीळ, गॅस्ट्रोसारख्या आजारांकडे दुर्लक्ष केले जाते. दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांची आकडेवारी सामान्यपणे पावसाळ्यात वाढते. पण अशा दूषित पाण्यामुळे हे प्रमाण अधिक वाढू शकते. आॅगस्टच्या १५ दिवसांत गॅस्ट्रोचे ५०७ रुग्ण आढळून आले आहेत. तर काविळीचे ५० रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. मुंबईकरांना शुद्ध पाणी पुरवण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. पण याकडे काही प्रमाणात दुर्लक्ष केले जात आहे. पाण्यासाठी महापालिका इतका पैसा खर्च करत आहे, तर सर्वांना शुद्ध पाणी मिळायला हवे, असे राऊळ यांनी सांगितले. ई कोलायचे जीवाणू असलेले पाणी प्यायल्याने आरोग्यावर दुष्परिणाम होतो. पोटात दुखणे, पोटात संसर्ग होणे, अतिसार, गॅस्ट्रो, काविळीसारखे आजार हे दूषित पाण्यामुळे होण्याचा धोका अधिक असतो. मुंबईकर पित असलेल्या पाण्यात ई कोलाय जीवाणू आढळून आले आहेत. गेल्या तीन महिन्यांत त्यात वाढच झाली आहे.दर महिन्याच्या शेवटच्या पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पातळीची स्थिती सांगण्यात येते. त्याचप्रमाणे आॅगस्ट महिन्यापासून दूषित पाण्याचा प्रयोगशाळेतून मिळणारा अहवाल बैठकीत सादर करण्यात येणार आहे.