Join us  

इंधन दरवाढीमुळे वस्तूच्या किमती वाढतील; वाहतूक व्यवस्थेवर होणार परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 3:41 AM

जे परराज्यातील आहेत ते कधी येतील हे सांगता येणार नाही. त्यामुळे एकीकडे गाड्या सुरू होतील आणि चालक मिळणार नाहीत. - प्रसन्न पटवर्धन

नितीन जगताप 

मुंबई : इंधन दरात सातत्याने वाढ होत असून याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर होत आहे. त्याबाबत बस अ‍ॅण्ड कॅब्स ऑपरेटर्स कॉन्फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रसन्न पटवर्धन यांच्याशी साधलेला संवाद.

इंधन दरवाढ आणि महागाई हे समीकरण कसे काम करते?वाहतूक व्यवसायात बसच्या ३५ ते ४० टक्के खर्च डिझेलचा असतो. डिझेलच्या दरात १० टक्के वाढ झाली तर बसच्या खर्चात आणखी १० टक्क्यांची भर पडते. सर्व किमती ४ टक्क्यांनी वाढतात. आता डिझेलची किंमत ६० रुपयांवरून ८० रुपयांवर गेली आहे. डिझेल दरवाढीचा वाहतुकीवर प्रचंड परिणाम होतो. कोणत्याही वस्तूची लॉजिस्टिक कॉस्ट १५ टक्के आहे. त्यातील ५० टक्के किंमत ही वाहतुकीची असते. त्यामध्ये ३५ टक्के वाढणार आहे. त्याचा वस्तूंच्या किमतीवर परिणाम होतो, या वस्तूंचे भाव ३ ते ५ टक्क्यांनी वाढतील. प्रत्येक व्यक्तीचा हा खर्च वाढेल. प्रत्येक खरेदीवर खर्च करावा लागेल.

लॉकडाऊनचा वाहतूक व्यवस्थेवर काय परिणाम झाला असे वाटते?अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. ती रुळावर आणणे हे मोठे आव्हान आहे. वाहतूक व्यवसायाची वाताहत लागली आहे. मालवाहतुकीची अवस्था ठीकच म्हणावी लागेल, कारण ती सुरू होती. बस वाहतूक पूर्णपणे बंद होती. देशातील १७ लाख खासगी बसपैकी दोन लाख बसही रस्त्यावर आल्या नाहीत. महाराष्ट्रात एक लाख ३० हजार बस आहेत. त्यापैकी जेमतेम १००० बस रस्त्यावर असतील अशी स्थिती आहे. लोकांना पगार कसा द्यायचा, हा प्रश्न आहे.इंधन दरवाढीमुळे वाहतुकीच्या अडचणी कशा वाढतात?इंधन दरवाढीमुळे वाहतुकीवर मोठा परिणाम होईल, वाहतूक परवडणार नाही. पगार एकीकडे कमी होणार आहे आणि वाहतुकीचा खर्च वाढणार आहे. त्याचा ताळमेळ कसा बसवायचा हा मोठा प्रश्न आहे.

सरकारने कोणत्या उपाययोजना करायला हव्यात?इतर देशांप्रमाणे तीन महिन्यांचा पगार मिळेल अशी व्यवस्था करायला हवी होती. पण व्यावसायिकांना सांगितले की, तुम्ही तुमच्या कामगारांना पगार द्या. त्या व्यवसायात उत्पन्न नसेल तर ते कामगारांना कोठून पगार देणार? कोणी खर्च करत नसल्याने अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. दोन संस्था पैसे देऊ शकतात, एक म्हणजे बँका. इतर व्यवसाय बंद असले तरी बँकांचा व्यवसाय तेजीत होता. पैसे नसतील तर काही व्यवस्था करायला हवी. काही तरी मार्ग शोधला पाहिजे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या