लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याला अमली पदार्थ पुरवीत असल्याप्रकरणी अटक केलेल्या सहायक दिग्दर्शक ऋषिकेश पवार याला बुधवारी दोन दिवसांची एनसीबी कोठडी मिळाली. अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने मंगळवारी रात्री उशिरा त्याला अटक केली असून, सुशांतच्या व्यसनाबद्दल अधिक माहिती मिळविण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली. त्याच्यावर अमली पदार्थ बाळगणे व पुरवठा करण्याचा प्रतिबंधक नियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पवार हा अनेक महिन्यांपासून एनसीबीच्या रडारवर होता. सुशांतला तो गांजा व हाशिम पुरवीत होता. मात्र, त्याचे प्रमाण कमी होते, तसेच बॉलिवूडमध्ये अनेकांना तो ड्रग्ज पुरवत होता. एनसीबीच्या पथकाने ऋषिकेशच्या चेंबूरच्या घरी छापा टाकला होता. मात्र, त्यापूर्वी तो तेथून फरार झाला होता. मंगळवारी त्याला ताब्यात घेऊन चौकशीनंतर अटक करण्यात आली. त्याचा लॅपटॉपही जप्त करण्यात आला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ऋषिकेश हा सुशांतसिंगच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये काम करीत होता. काही महिने तो त्याचा रूममेट म्हणून राहावयास होता. घरगडी दीपेस सावंत त्याच्याकडून गांजा व हाशिम सुशांतला मिळवून देत असल्याचा जबाब दिला आहे. त्यामुळे त्याचा शोध अनेक महिन्यांपासून सुरू होता, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. बुधवारी सकाळी त्याला कोर्टात हजर करण्यात आले. त्याच्याकडे सविस्तर चौकशी करण्यात येत आहे.