ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - भारतीय नौदलाची शान राहिलेल्या आयएनएस विक्रांतला अखेर भंगारात काढण्यास सुरूवात झाली आहे. दारुखाना येथे उभ्या असलेल्या विक्रांतचे एक-एक पार्ट काढण्यात येणार असून ही संपूर्ण विक्रांत भंगारात काढण्यासाठी तब्बल ७ ते ८ महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
भारतीय नौदलाची शक्ती वाढविण्यासाठी आयएनएस विक्रांतची १९५७ ला ब्रिटनमधून खरेदी करण्यात आली होती. त्यावेळी तिला एचएमएस हर्क्यूलिस असे संबोधण्यात येत होते. भारतीय नौदल सैन्यांनी विक्रांतचा १९६१ साली आपल्या ताफयात समावेश केला होता. विक्रांतने भारत-पाक यांच्यात झालेल्या युध्दात महत्वाची भूमिका बजावली होती. युध्दात विमान वाहतूक करण्याचा पहिला मान विक्रांतकडे जातो हे विशेष. विक्रांतला वाचविण्यात यावे अशी मागणी भाजपाने केंद्र व राज्य सरकारकडे केली होती. परंतू आता राज्यात व केंद्रात भाजपाची सत्ता असताना विक्रांतला वाचविण्यासाठी भाजपाकडून कोणतेच प्रयत्न होताना दिसले नाही. विक्रांतला भंगारात काढण्यात येवू नये अशी मागणी करीत विक्रांतवर भव्य म्यूझियम बांधता येवू शकते अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेने पुढाकारही घेतला होता. दरम्यान, विक्रांतची आजची अवस्था खूप जर्जर झाली असून त्याची दुरूस्ती करणे कठिण आहे, त्यामुळेच तिला भंगारात काढावे लागले आहे असे सांगत जर राज्यात व केंद्रात दोन वर्षापूर्वी भाजपाचे सरकार आले असते तर आम्ही विक्रांतला नक्की वाचविले असते असे स्षटीकरण भाजपा खासदार किरिट सोमय्या यांनी दिले.