मुंबई : रिक्षा व टॅक्सीचे भाडे निश्चित करण्यासाठी राज्य शासनाने खटुआ समिती स्थापन केली होती. समितीचे अध्यक्ष बी.सी.खटुआ यांनी सोमवारी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची मंत्रालयात भेट घेत अहवाल सुपूर्द केला. रिक्षा-टॅक्सी भाडे निश्चितीसाठी २२४ पानांचा अहवाल तयार करण्यात आला आहे. यात भाडे निश्चितीसाठी सुधारणा नमूद करण्यात आल्या आहेत. यामुळे ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर प्रवाशांना भाडेवाढीची झळ बसण्याची शक्यता आहे.मुंबईसह राज्यात भाडे निश्चित करण्यासाठी राज्य शासनाने समितीची स्थापन केली होती. काळी-पिवळी टॅक्सीसह आॅटोरिक्षा आणि एसी टॅक्सी यांच्या भाडे निश्चितीसाठी समितीने राज्यातील प्रवासी सुविधांचे सर्वेक्षण केले. त्यानूसार समितीचा अहवाल पूर्ण झाला आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची भेट घेऊन समितीने अहवाल दिला आहे. यावेळी खटुआ यांच्यासह परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, समिती सदस्य गिरीष गोडबोले, नितीन दोशी उपस्थित होते.परिवहन विभागातर्फे या अहवालाचा सविस्तर अभ्यास केला जाईल. जनतेवर जास्त भार न देता भाडे निश्चित करण्यात येणार आहे. शहरांमध्ये धावणाºया अॅपबेस सिटी टॅक्सीच्या भाडेनिश्चितीसाठी देखील समितीने शिफारशी नोंदवल्या आहेत. याचा अभ्यास करुन तात्काळ निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.
रिक्षा-टॅक्सी भाडेनिश्चितीचा चेंडू परिवहन मंत्र्याकडे, भाडे निश्चितीसाठी २२४ पानांचा अहवाल तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 03:08 IST