मुंबई : जोगेश्वरी पश्चिम येथील किशन जाधव (३२) या रिक्षाचालकाने त्याची पत्नी आम्रपाली (२८) हिची हत्या करून नंतर स्वत:देखील आत्महत्या केली. त्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये आत्महत्यामागील नेमके कारण लिहिण्यात आले नसल्याचे आंबोली पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, जाधव दाम्पत्याच्या तीन लहान मुलांचा सांभाळ त्यांच्या नातेवाइकांनी करण्याचे समजते. भर दिवाळीमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे जोगेश्वरी परिसरात शोककळा पसरली होती. तसेच आई बापाच्या जाण्याचे अनाथ झालेल्या तीन चिमुरड्यांचा आता वाली कोण अशी चिंता स्थानिकांना भेडसावू लागली होती. जाधव दाम्पत्याला चार, दोन आणि एक वर्षाचा अशी तीन मुले आहेत. त्यांना अनाथ आश्रमात पाठवण्याची वेळ आली होती. मात्र त्यांच्या नातेवाइकांनी या मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी घेतल्याचे आंबोली पोलिसांनी सांगितले. तसेच मृत्यूनंतर घटनास्थळी पोलिसांना सुसाइड नोटही सापडली होती. मात्र त्यातही मृत्यूचे कारण लिहिण्यात आले नाही. (प्रतिनिधी)
रिक्षाचालकाच्या आत्महत्येचे गूढ कायम
By admin | Updated: November 15, 2015 01:44 IST