Join us

तरुणी-रिक्षाचालकाची हाणामारी

By admin | Updated: July 8, 2017 04:00 IST

आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी रिक्षा न नेल्यामुळे संतापलेल्या एका १९ वर्षीय प्रवासी तरुणीने महेंद्र पितळे (४९, रा. आझादनगर, कॅसलमिल, ठाणे) या

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी रिक्षा न नेल्यामुळे संतापलेल्या एका १९ वर्षीय प्रवासी तरुणीने महेंद्र पितळे (४९, रा. आझादनगर, कॅसलमिल, ठाणे) या रिक्षाचालकाशी वाद घातला. याच वादातून त्याने तिला मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. दरम्यान, या तरुणीनेही आपल्याला मारहाण केल्याची तक्रार पितळेने ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल केली.खोपट भागातून जाणाऱ्या पितळेच्या शेअर रिक्षात ही तरुणी सकाळी बसली. खोपटच्या चौकातून तिने चरईला रिक्षा नेण्याचा आग्रह धरला. त्याने मात्र रिक्षा टेंभीनाका मार्गे जाईल, असे स्पष्ट केले. तिला दगडी शाळेकडे जायचे असल्यामुळे त्यांच्यात याच कारणावरून वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यामुळे त्याने तिला मूस चौकात मारहाण केली. यामुळे तिनेही त्याला मारहाण केली. अखेर प्रकरण पोलीस ठाण्यात आल्यानंतर मुलीने आधी मारहाण केल्यानंतर आपणही तिला मारल्याचा दावा रिक्षाचालकाने केला. तर त्यानेच आपल्याला मारहाण केल्याची उलट तक्रार या तरुणीने दिली. या मुलीने जो मार्ग दाखविला होता, तो ‘नो एन्ट्री’चा होता. त्यामुळेच रिक्षा जाऊ शकत नव्हती, असेही पितळे याने स्पष्ट केले. पोलिसांनी अखेर दोघांविरुद्ध मारहाण केल्याची तक्रार नोंदविली असून साधी अदखलपात्र तक्रार असल्यामुळे कोणालाही अटक केलेली नसल्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.रिक्षाचालकांची वाढती अरेरावीराबोडीच्या सिकंदर शेख या रिक्षाचालकानेही नौपाड्यातील तरुणीचा बुधवारी रात्री नजरेने इशारा करून विनयभंग केला. तिने याचा जाब विचारत त्याच्या श्रीमुखात लगावली होती. त्यानेही चूक कबूल करण्याऐवजी तिला जबर मारहाण केली. या प्रकरणी मारहाण आणि विनयभंगाची तक्रार दाखल झाल्यानंतर शेखला पोलिसांनी अटक केली. अवघ्या एक दिवसाच्या आत पुन्हा तरुणीला मारहाणीचा प्रकार घडल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.