Join us

रिक्षा-टेम्पोवाल्यांनी भरले रस्त्यावरचे खड्डे!

By admin | Updated: December 28, 2014 23:13 IST

रस्त्यावरच्या खड्ड्यांवरची ओरड ही कायमचीच असते. हे खड्डे संबंधित प्रशासनानेच भरावेत, रस्ते त्यांनीच करावेत ही मागणीही नेहमीचीच

बिरवाडी : रस्त्यावरच्या खड्ड्यांवरची ओरड ही कायमचीच असते. हे खड्डे संबंधित प्रशासनानेच भरावेत, रस्ते त्यांनीच करावेत ही मागणीही नेहमीचीच आणि तीही रास्तच, मात्र कुणी या विचाराला बगल देऊन स्वत: कामासाठी उतरत असेल तर. बिरवाडीतील खरवली- काळीज या दोन ग्रामपंचायतींना जोडणाऱ्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी रिक्षा आणि टेम्पो संघटनांनी पुढाकार घेतला आणि रस्ता चकाचक केला.महाड तालुक्यातील बिरवाडी ग्रा. पं. परिसरातील मच्छी मार्केट, शिवाजी चौक ते बिरवाडी बाग हा रस्ता दोन ग्रामपंचायतींच्या अखत्यारीत येतो. दोन ग्रा. पं. च्या वादामुळे हा रस्ता रखडल्याने छत्रपती शिवाजी चौक, बिरवाडी रिक्षा व टेम्पो संघटनेच्यावतीने या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये कोणतीही शासकीय मदत न घेता खड्डे बुजविण्याचे काम सुुरु करण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष राजू मोहिते यांनी प्रत्यक्ष भेटी दरम्यान दिली आहे. बिरवाडी ग्रा. पं. च्या विभाजनानंतर बिरवाडी बाग ते शिवाजी चौक, बिरवाडी मच्छी मार्केट या रस्त्याच्या मालकीचा वाद उद्भवल्याने या रस्त्याची दुरुस्ती कोणी करायची यामध्ये हा रस्ता रखडला आणि त्याचा फटका रिक्षा चालक व टेम्पो चालकांना बसला. अवजड वाहतूक करताना तसेच प्रवासी वाहतूक करताना या रस्त्यावरील चढाला पडलेल्या खड्ड्यामुळे वारंवार अपघात झाले होते हे टाळण्याकरिता संघटनेच्या वतीने स्वखर्चाने या रस्त्यावरील खड्ड्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.