मुंबई: दुचाकीवरुन जाणाऱ्या प्रेमी युगलास रस्त्यालगत थांबवून त्यांना लुटल्याची घटना सोमवारी सांताक्रुझ- चेंबूर लिंक रोडवर घडली. या प्रकरणी टिळक नगर पोलिसांनी तीन रिक्षा चालकांना अटक केली असून पोलीस त्यांचा अधिक तपास करत आहेत. घाटकोपरच्या पारशेवाडी येथे राहणारा विश्वजीत पवार हा त्याच्या पे्रयसीसोबत सोमवारी टिळक नगर येथून कुर्ला पश्चिम येथे जात होता. दरम्यान रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तो नुकताच बांधण्यात आलेल्या सांताक्रुझ- चेंबूर लिंक रोडवरुन जात असताना त्याच्यासमोर अचानक एक रिक्षा थांबली. रात्रीच्या वेळेस या मार्गावर रहदारी कमी असल्याने या रिक्षा चालकांनी विश्वजीत याला दुचाकीवरुन खाली उतरण्यास सांगितले. त्यानंतर तिन्ही आरोपींनी त्याला मारहाण करत त्याच्या गळ्यातील सोनसाखळी आणि काही रोख रक्कम काढून घेतली. याच दरम्यान या रस्त्यावरुन काही पादचारी जात होते. त्यांनी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेऊन यातील वसीम खान (२२) आणि इम्रान खान (२१) या दोन आरोपींना पकडले. मात्र या दरम्यान राजकुमार जैस्वाल (२१) हा आरोपी रिक्षा घेऊन फरार झाला. मात्र, आज दुपारी यातील तिसऱ्या आरोपीला देखील पोलिसांनी अटक केली आहे.(प्रतिनिधी)
चेंबूरमध्ये रिक्षा चालकांनी युगुलांना लुटले
By admin | Updated: January 21, 2015 02:04 IST