Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकांची मनमानी सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 02:55 IST

सुनियोजित शहर अशी ओळख असलेल्या नवी मुंबई परिसरात बेशिस्त रिक्षा चालकांमुळे ही ओळख पुसली जाणार की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे.

नवी मुंबई : सुनियोजित शहर अशी ओळख असलेल्या नवी मुंबई परिसरात बेशिस्त रिक्षा चालकांमुळे ही ओळख पुसली जाणार की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे. शहरातील प्रत्येक रेल्वे स्थानकाबाहेर लागूनच प्रशस्त बस टर्मिनल्स, पार्किंग आणि रिक्षा-टॅक्सी स्टँडचीही व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु काही रेल्वे स्थानकाबाहेर पडताच प्रवाशांना रिक्षाचालकांच्या बेशिस्तपणाचा सामना करावा लागत आहे. स्थानकांबाहेर नियोजित रिक्षा तळ असून रिक्षांना व प्रवाशांना रांग लावण्याची व्यवस्था आहे. असे असूनही रिक्षाचालक प्रवासी मिळविण्याच्या चढाओढीत मनमानीपणे रिक्षा उभ्या करताना दिसून येतात.वाशी, सानपाडा, नेरुळ आदी रेल्वेस्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. त्यात आपल्या रिक्षाला सर्वप्रथम भाडे मिळावे यासाठी रिक्षाचालक अगदी स्थानकांच्या तोंडावर आपल्या रिक्षा उभ्या करतात. पोलिसांच्या अनुपस्थितीत रिक्षाचालक आपल्या बेलगाम वागण्याने प्रवाशांना हैराण करून सोडतात. त्यातच शेअर आॅटो हा प्रवाशांच्या सोयीचा ठरणारा प्रवास वाहतुकीसाठी त्रासदायक ठरू लागला आहे. ग्राहक मिळण्यासाठी बस,रेल्वे थांब्यांवरतीच रिक्षा आणून थांबविण्याचा प्रकार बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी त्रासदायक ठरू लागला आहे. संध्याकाळी लोकल आल्याने प्रवासी बाहेर पडताच, रिक्षाचालक प्रवाशांसाठी भर रस्त्यात रिक्षा थांबवतात.अनेकदा एखादा प्रवासी कमी असल्यास तो प्रवासी मिळेपर्यंत रिक्षाचालक रिक्षा जागेवरून हलवत नाहीत. मग त्यामुळे कितीही वाहतूककोंडी झाली तरी त्याकडे ते दुर्लक्ष करतात. त्यात रस्त्याच्या निम्म्या भागात काँक्र ीटीकरणाचे काम सरू असल्याने निम्माच रस्ता वापर योग्य आहे. त्यामुळे प्रवाशांना रस्त्यावरून चालणेही कठीण होत आहे. रात्रीच्या वेळी रिक्षाचालकांची ही मुजोरी अधिक प्रमाणात दिसून येते. प्रवासी मिळवण्याच्या वादात अनेकदा रिक्षाचालकांतच भांडणे पाहायला मिळतात.