Join us

रिक्षाचालकावर गुन्हा दाखल

By admin | Updated: March 7, 2015 00:58 IST

आरे कॉलनीमध्ये एका रिक्षाचालकाने पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचे प्रकरण ताजे असतानाच चारकोपमध्येही असाच एक प्रकार उघडकीस आला आहे.

मुंबई : आरे कॉलनीमध्ये एका रिक्षाचालकाने पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचे प्रकरण ताजे असतानाच चारकोपमध्येही असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. २५ वर्षीय तरुणीचे अपहरण करून नंतर तिच्यासोबत अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न एका ३० वर्षीय रिक्षाचालकाने केला. याप्रकरणी त्या तरुणीने गुरु वारी रात्री चारकोप पोलीस ठाण्यात अपहरण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.सीमा (नावात बदल) ही तरु णी चारकोपच्या महावीर नगर परिसरात राहते. लोअर परळमध्ये एका खासगी कंपनीमध्ये काम करणाऱ्या सीमाने २६ फेब्रुवारीला रात्री साडेनऊच्या सुमारास मालाड परिसरातून एक रिक्षा पकडली. रिक्षा तिच्या घराजवळ येताच तिने रिक्षावाल्याला गाडी थांबविण्यास सांगितले. मात्र त्याने रिक्षा न थांबवता तिला घेऊन पसार होण्याचा प्रयत्न केला. तिने वेळीच प्रसंगावधान साधत रिक्षातून आरडाओरड करण्यास सुरुवात केली. तसेच तिच्या हातातील पर्सही तिने त्या रिक्षावाल्याच्या डोक्यात मारली. त्यामुळे घाबरलेल्या रिक्षाचालकाने त्वरित रिक्षा थांबवली. रिक्षा थांबताच सीमा रिक्षातून उतरली. त्यावेळी घाबरलेल्या या रिक्षाचालकाने घटनास्थळाहून धूम ठोकली. या प्रकारामुळे सीमालाही जाम धक्का बसला होता़ त्यामुळे त्या दिवशी तिने पोलिसांकडे कोणतीही तक्र ार दाखल केली नाही. चारकोप पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्यात बुधवारी पुन्हा तो रिक्षाचालक सीमाला चारकोप परिसरात दिसला. तेव्हा हिंमत करून ती त्याच्याजवळ गेली आणि तिने त्याच्या रिक्षाची चावी हिसकावण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्या वेळी त्याने ‘देखता हू, क्या कर लेगी मेरा’ असे म्हणत सीमाला धमकावले. याप्रकरणी सीमाने चारकोप पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलीस त्या रिक्षाचालकाचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)