Join us

रिक्षा बंदमुळे प्रवाशांचे हाल

By admin | Updated: June 18, 2015 01:02 IST

कामगार नेते शरद राव यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी रिक्षा बंदला नवी मुंबईत चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.

नवी मुंबई : कामगार नेते शरद राव यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी रिक्षा बंदला नवी मुंबईत चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. विशेष म्हणजे शिवसेनेसह इतर काही संघटनांनी आजच्या बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. तरीही अनेक भागांत कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यामुळे एनएमएमटी व बेस्ट उपक्रमांच्या गाड्यांवर ताण पडला. रिक्षा-टॅक्सीचालकांच्या विविध मागण्यांसाठी आजचा लाक्षणिक बंद पुकारण्यात आला होता. नवी मुंबई रिक्षा महासंघाने बंदमध्ये सहभागी होण्याची यापूर्वीच घोषणा केली होती. मात्र बंदच्या आदल्यादिवशी म्हणजे मंगळवारी शिवसेनेसह इतर संघटनांनी प्रवाशांच्या हितासाठी बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यामुळे या बंदचा फज्जा उडेल, असे तर्क लावले जात होते. प्रत्यक्षात मात्र या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच रिक्षा बंद असल्याने प्रवाशांचे विशेषत: नोकरदारांचे व विद्यार्थ्यांचे हाल झाले. बस थांब्यांवर प्रवाशांची एकच गर्दी उसळली होती. तर रिक्षा नसल्याने अनेकांनी पायीच रेल्वे स्थानक गाठले. काही भागांत तुरळक प्रमाणात रिक्षा सुरू होत्या. सीबीडी, नेरूळ, ऐरोली भागात काही प्रमाणात रिक्षा धावताना दिसल्या. महासंघाचे अध्यक्ष कासम मुलानी यांनी बंद शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा केला आहे. (प्रतिनिधी)आरटीओवर मोर्चारिक्षाचालकांनी आज पुकारलेल्या एकदिवसीय लाक्षणिक बंदच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई रिक्षा महासंघाच्या वतीने आरटीओवर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्याप्रमाणात रिक्षाचालक सहभागी झाले होते. मोर्चाच्या शिष्टमंडळाने आरटीओ अधिकारी संजय धायगुडे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देऊन त्यांची तातडीने पूर्तता करण्याची मागणी केली. यावेळी प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली. महासंघाचे सरचिटणीस सुनील बोर्डे व इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.