Join us

आरटीई प्रवेश निश्चितीसाठी सुधारित तारखा लवकरच हाेणार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण कायद्यानुसार आरटीईच्या २५ टक्के प्रवेशासाठी राज्यस्तरीय सोडत गुरुवारी काढण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण कायद्यानुसार आरटीईच्या २५ टक्के प्रवेशासाठी राज्यस्तरीय सोडत गुरुवारी काढण्यात आली. पुणे जिल्ह्याचा अपवादवगळता राज्यातील तब्बल ६७ हजार ५५३ विद्यार्थ्यांची सोडतीमध्ये निवड झाली. मात्र, याआधी दिलेल्या प्रवेशाच्या तारखा आता शिक्षण संचालनालयाकडून संकेतस्थळावरून काढून टाकण्यात आल्या असून, कडक निर्बंध संपल्यानंतर प्रवेशाबाबत संकेतस्थळावर प्रवेशाच्या तारखांबाबत नव्याने सूचना दिल्या जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

आरटीई प्रवेशासाठीच्या राज्यातील नऊ हजार ४३२ शाळांतील ९६ हजार ६८४ जागांसाठी तब्बल दोन लाख २२ हजार २९ अर्ज पालकांनी भरले होते. त्यातून ६७ हजार ५५३ विद्यार्थ्यांची निवड झाली. राज्यातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ठाण्यातून सर्वाधिक ९,०८८ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्याखालोखाल नागपूरमधून ५,६११ विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले.

दरम्यान, केवळ ‘एसएमएस’वर अवलंबून राहू नये, पोर्टलवर अर्ज क्रमांक टाकून प्रवेशाची तारीख आणि ठिकाण पाहावे. एसएमएसद्वारे सूचना आल्यानंतरच हमीपत्र आणि ॲलॉटमेंट लेटरची प्रिंट काढून प्रवेशासाठी पालकांनी पडताळणी समितीकडे जावे. मुदतीनंतर संबंधित पालकांचा प्रवेशाचा हक्क राहणार नाही. प्रतीक्षा यादीतील पालकांनी बालकांच्या प्रवेशासाठी पडताळणी समितीकडे सध्या जाऊ नये, त्यांच्यासाठी पोर्टलवर स्वतंत्र सूचना देण्यात येईल. एकाच पालकाने दोन अर्ज (डुप्लिकेट) भरून त्यांना लॉटरी लागली तरीही त्यांचा प्रवेश रद्द केला जाईल, असे शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले.

...........................