Join us

मान्सूनपूर्व कामांचा आढावा

By admin | Updated: June 12, 2014 02:36 IST

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या विविध आजारांवर आणि साथीच्या आजाराची लागण झालेल्या रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळावे

नवी मुंबई : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या विविध आजारांवर आणि साथीच्या आजाराची लागण झालेल्या रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळावे या पार्श्वभूमीवर वाशी येथील मनपाच्या प्रथम संदर्भ रुग्णालयामध्ये अतिरिक्त १०० खाटांची संख्या वाढविली आहे. त्यामुळे रुग्णांना दाखल करून उपचार करणे सोपे होणार आहे. पावसाळ्यात साथीच्या रुग्णांच्या संख्येत अधिक वाढ होते. या रुणांवर व्यवस्थित उपचार करता यावेत या उद्देशाने मनपाच्या वतीने अतिरिक्त १०० खाटा वाढविण्यात आल्या आहेत. या खाटांमुळे रुग्णांना वेळत उपचार मिळणार असून त्यांना होणार त्रास कमी होणार आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला वाशीच्या प्रथम संदर्भ रुग्णालयामध्ये ३०० ते ३१५ रुग्ण विविध आजारांवर उपचार घेत आहेत. पावसाळ्याच्या काळात या संख्येत अधिक वाढ होऊ शकते. त्यामुळे अतिरिक्त खाटा वाढवल्या आहेत. तसेच नवी मुंबई कार्यक्षेत्रात नेरूळ येथे मनपा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे काम सुरू असल्यामुळे रुग्णालय पूर्णत:बंद आहे. ऐरोलीतील मनपा रुग्णालय, रबाळे येथील महाजन हॉस्पिटलमध्ये सुरू केले आहे. मात्र त्याठिकाणी खाटांची संख्या खूपच कमी आहे, तर कोपरखैरणेच्या रुग्णांलयामध्ये फक्त प्रसूतीसाठी महिलांना दाखल करून घेतले जाते. त्यामुळे नवी मुंबईतील सर्व रोगांच्या उपचारासाठी रुग्णांना वाशीच्या मनपा रुग्णालयामध्ये यावे लागत आहे. त्यामुळे वाशी रुग्णालयाचा ताण वाढला असून याच्यावर तोडगा म्हणून पावसाळ्यात खाटांची संख्या वाढविण्यात आली आहे. ही सुविधा फक्त पावसाळ्याच्या कालावधीपुरती असणार आहे.पावसाळ्यात टायफॉईड, मलेरिया, गॅस्ट्रो आदी रोगांची शक्यता वाढत असते. त्यामुळे रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी जागा नसल्याने अनेक वेळा त्यांना हवा तसा उपचार मिळत नाही. यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता असते. रुग्णांना उपचार वेळेवर मिळावे यासाठी खाटांची संख्या वाढविण्यात आली आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या विविध रोगांंवर मात करण्यास मदत होणार असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. रमेश निकम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)