Join us

महसूलची कामे धीम्या गतीने

By admin | Updated: April 21, 2015 22:36 IST

महाड तालुका हा रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे. महसुली उत्पन्न, नैसर्गिक आपत्ती, विविध राजकीय दौरे आणि पर्यटन क्षेत्र असल्याने या

दासगाव : महाड तालुका हा रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे. महसुली उत्पन्न, नैसर्गिक आपत्ती, विविध राजकीय दौरे आणि पर्यटन क्षेत्र असल्याने या ठिकाणी नेहमीच महसूल विभागावर कामाचा बोजा असतो. महसूल विभागामध्ये गाव पातळीवर काम करणाऱ्या तलाठ्यावर या कामाची संपूर्ण भिस्त असते. पण महाड तालुक्यात सात तलाठी पदे रिक्त असल्याने या कामाचा अतिरिक्त ताण इतर तलाठ्यांवर येत आहे. तर महसुली कामामध्ये दिरंगाई होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहे.महाड तालुक्यात १८३ महसुली गावे आहेत. या गावांचा कारभार चालविण्यासाठी ३६ तलाठी सजे आहेत. या कार्यालयाच्या माध्यमातून ग्रामीण शेतकरी आणि रेशनिंग कार्डवरील नोंदी, सातबारा नोंदी, शेतसारा वसुली अशी अनेक कामे केली जातात. तर शासकीय योजनांची अंमलबजावणीही याच तलाठ्यांमार्फत ग्रामीण भागात केली जाते. यासाठी प्रत्येक तलाठी सजात तलाठी नेमणूक गरजेची असते. तलाठ्यांच्या रजा व इतर काम पाहता एक तलाठी एक पद अतिरिक्त ठेवण्यात आले आहे. पण महाडमध्ये ३७ तलाठ्यांची गरज असताना सात तलाठी सजांमध्ये तलाठी पदे रिक्त आहेत. यामध्ये दासगाव, गोमेंडी, रेवतळे, दहीवड, शेलटोली, नरवण, निगडे आणि खरवली या मोठ्या गावांचा समावेश आहे. ग्रामीण आणि दुर्गम डोंगराळ भागातून महसुली कामासाठी ग्रामस्थ तलाठी सजामध्ये येतात. पण तलाठी नसल्याने कार्यालय बंद मिळते. सदर तलाठी सजाचा कार्यभार दुसऱ्या कोणत्या तरी तलाठ्याकडे दिलेला असतो. मागील वर्षी सात नवीन पदे भरण्यात आली. हे सात तलाठी हजर झाले पण यावेळी पाच तलाठ्यांच्या बदल्या झाल्या तर एक तलाठी निलंबित झाला आहे. दोन तलाठी कामांसाठी अलिबाग येथे वर्ग करण्यात आले आहेत. या वर्ग के लेल्या तलाठ्यांचा पगार महाडमधून निघत असला तरी महाडमध्ये या तलाठ्यांचा काहीही उपयोग नाही. यामुळे रिक्त पदांबाबतची परिस्थिती कायम राहिली आहे. (वार्ताहर)