Join us
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्मूल्यांकन घोटाळा

By admin | Updated: July 16, 2015 22:33 IST

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला पुनर्मूल्यांकन घोटाळा चव्हाट्यावर आला आहे. काही दिवसांपूर्वीच चार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

- तेजस वाघमारे, मुंबईमुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला पुनर्मूल्यांकन घोटाळा चव्हाट्यावर आला आहे. काही दिवसांपूर्वीच चार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर पुन्हा एका रॅकेटचा पर्दाफाश करण्यात विद्यापीठ परीक्षा विभागाला यश आले आहे. पात्रता नसताना पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे पुनर्मूल्यांकनाचे पेपर तपासणाऱ्या मॉडरेटरला परीक्षा नियंत्रकांनी रंगेहाथ पकडले. या प्रकरणी विद्यापीठाने चौकशी समिती गठीत केली आहे. वाणिज्य शाखेशी संबंधित असलेल्या ७0वर्षीय मॉडरेटरने एम.ए.च्या विविध अभ्यासक्रमांचे पुनर्मूल्यांकनाचे सात पेपर तपासल्याचे उघडकीस आले. विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाल्याचे संबंधित विभागांना समजताच त्यांनी याबाबत परीक्षा विभागाशी संपर्क साधला. परीक्षा नियंत्रक दिनेश भोंडे यांनी पुढाकार घेऊन कारवाई केल्याने या प्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे. या मॉडरेटरने त्याच्या विषयाशी संबंधित नसलेल्या पुनर्मूल्यांकनाच्या विविध विषयांच्या उत्तरपत्रिका तपासल्याचे स्पष्ट झाले आहे. पुनर्मूल्यांकनाच्या या घोटाळ्यामध्ये परीक्षा विभागातील काही कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही टोळी पुनर्मूल्यांकनाच्या निकालामध्ये विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी एका विषयासाठी तब्बल ४० हजार रुपये उकळत होती. त्यापैकी १० हजार रुपये संबंधित मॉडरेटरला देण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.विद्यापीठातर्फे पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करणारे असंख्य विद्यार्थी पास होत असल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात सातत्याने होत होती. मात्र, त्याचे सत्य कधीही उघड होऊ शकले नव्हते. परंतु परीक्षा नियंत्रक दिनेश भोंडे यांनी पदभार हाती घेताच परीक्षा विभागात चालणारे गैरप्रकार उघड होऊ लागले आहेत. पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना हेरून त्यांच्याकडून हजारो रुपये उकळून त्यांना पास करणाऱ्या विद्यापीठातील चार अधिकाऱ्यांना गेल्या आठवड्यात विद्यापीठाने निलंबित केले होते. या कारवाईला काही दिवस होत नाहीत, तोवर विद्यापीठात आणखी एका प्रकरणाचा छडा लागला आहे. विद्यापीठातील पुनर्मूल्यांकन घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी परीक्षा विभागाने समिती नेमली आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर संबंधित व्यक्तीवर कठोर करण्यात येईल; तसेच यामध्ये सहभागी असणाऱ्यांवरही कडक कारवाई करण्यात येईल, असे विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक दिनेश भोंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.