Join us

सहा तासच चालणार 'रीटर्न' तिकीट

By admin | Updated: February 12, 2016 10:21 IST

उपनगरीय लोकलचे रीटर्न तिकीट सहा तासांसाठी ग्राह्य धरण्याची महत्त्वपूर्ण सूचना मध्य रेल्वेकडून रेल्वे बोर्डाला पाठविण्यात आली आहे

रेल्वे बोर्डाकडे सूचनामुंबई : उपनगरीय लोकलचे रीटर्न तिकीट सहा तासांसाठी ग्राह्य धरण्याची महत्त्वपूर्ण सूचना मध्य रेल्वेकडून रेल्वे बोर्डाला पाठविण्यात आली आहे. रीटर्न तिकिटाचा होणारा गैरवापर थांबविण्यासाठी आणि उत्पन्न वाढीसाठी ही सूचना करण्यात आल्याचे रेल्वेतील सूत्रांकडून सांगण्यात आले.उपनगरीय लोकलचे सिंगल तिकीट काढतानाच प्रवाशांकडून अनेकदा रीटर्न तिकीटही काढले जाते. एखाद्या स्थानकातून प्रवाशाने रीटर्न तिकीट काढल्यास ते तिकीट दुसर्‍या दिवशीही परतीच्या प्रवासासाठी ग्राह्य धरले जाते. त्याचप्रमाणे शनिवारी रीटर्न तिकीट काढल्यास सोमवारपर्यंत ते परतीच्या प्रवासासाठी ग्राह्य धरण्यात येते. मध्य रेल्वेमार्गावर दररोज अशा प्रकारे जवळपास ४0 हजारांहून अधिक रीटर्न तिकिटे काढली जात असल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले. तथापि, रीटर्न तिकीट काढल्यानंतर काही प्रवासी तेच तिकीट परतीच्या प्रवासासाठी अन्य लोकांकडेही देत असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आले आहे. त्यामुळे रेल्वे उत्पन्नापासून वंचित राहत तर आहेच, पण त्यातून काही गैरप्रकारही होत असल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)