खालापूर : खोपोली नगरपालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ससेहोलपट सुरू आहे. ज्यांनी नगर पालिकेच्या सेवेमध्ये आपले आयुष्य घालवले, त्यांच्या पदरी आजही पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे निराशाच आली आहे. कामगारांच्या हक्काची पेन्शन मिळत नसल्याने वृद्ध, सेवानिवृत्तांवर उपासमारीची वेळ आली आहे. या प्रकरणी पेन्शन मिळत नसल्याच्या निषेधार्थ सर्व कामगारांनी पोलीस स्थानकात निवेदन देवून माध्यमांपुढे आपल्या संतप्त प्रतिक्रि या देत दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. खोपोली नगरपालिकेचे साडेतीनशे कामगार सेवानिवृत्त असून निवृत्तीनंतरही कामगारांना पालिकेकडून मिळणाऱ्या सेवा पुरविण्यात पालिका अपयशी ठरली आहे. शेकडो कामगारांना दर महिन्याला मिळणारी पेन्शन वेळेवर मिळत नसल्याने वयोवृद्ध कामगार पालिकेच्या ढिसाळ कारभारावर हैराण झाले आहेत. बुधवारी कामगारांनी पेन्शन देत नसल्याच्या निषेधार्थ यशवंत गुरव, मारुतीराव विपट, मोहन जाधव, भगवान पवार, आर. एस. कळमकर, कमळ सोलंखी, हरिभाऊ जाधव, केशव शेंडे, के.जी. निकम, मनोहर शहाणे अशा अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांनी एकत्र येवून नगर पालिका आणि पोलीस प्रशासनाला निवेदन दिले. त्यांनी शांततेच्या मार्गाने पालिकेचे मुख्याधिकारी व नगराध्यक्षांवर फौजदारी कारवाईची मागणी केली.दरम्यान, पेन्शनव्यतिरिक्त सहाव्या वेतन आयोगाचा फरक व बोनस या संदर्भातही त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार झाल्याचा आरोप कामगारांनी केला असून प्रशासनाच्या एकूण कारभारावर त्यांनी प्रश्नचिन्ह उभे करून अन्यायाबाबत राज्य मानवी हक्क आयोगाकडे कैफियत मांडली. (वार्ताहर)
पेन्शनसाठी निवृत्तांचे हेलपाटे
By admin | Updated: December 17, 2014 23:06 IST