मुंबई : पेण अर्बन बँक घोटाळ्याचा तपास आणि घोटाळ्याची रक्कम वसूल करण्यासाठी तपास यंत्रणांकडून गेली चार वर्षे कोणतीच ठोस पावले उचलण्यात आली नाहीत. त्यामुळे याप्रकरणाचा तपास करणाऱ्या वेगवेगळ्या तपास यंत्रणांच्या तपासावर देखरेख करण्यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. जे. ए. पाटील यांची नियुक्ती करण्याचे संकेत उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले.पेण अर्बन बँकेच्या संचालकांनी सुमारे ५३८ कोटी रुपयांची अफरातफर केली. बनावट बँक खाती उघडून त्यातील रक्कम हडप केली. तसेच ही रक्कम परदेशामध्ये गुंतवली, असा आरोप पेण अर्बन बँकेच्या संचालकांविरुद्ध आहे. सर्व ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळाव्या आणि घोटाळ्याच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्यात यावी, अशी मागणी बँकेच्या ठेवीदारांनी उच्च न्यायालयात केली आहे. यावरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठापुढे होती. आॅक्टोबर महिन्यातील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने पेण अर्बन बँक घोटाळ्याच्या तपासावर नाराजी व्यक्त करत राज्य सरकारला एसआयटी नेमण्याची आदेश दिले होते. मंगळवारच्या सुनावणीवेळी राज्य सरकारने एसआयटी नेमण्यासाठी चार आठवड्यांची मुदत द्यावी, अशी मागणी खंडपीठाकडे केली. त्यावर खंडपीठाने राज्य सरकारला २१ डिसेंबरपर्यंत एसआयटी नेमण्यासाठी मुदतवाढ दिली. (प्रतिनिधी)
तपासावर देखरेखीसाठी निवृत्त न्यायाधीश नेमणार
By admin | Updated: December 2, 2015 02:24 IST