संदीप प्रधान - मुंबई
सरकारी नोकरीत असताना राजकारणातील डावपेच, ताणतणाव, जीवघेणी स्पर्धा जवळून पाहिलेल्या आणि काहीवेळा राजकारण्यांच्या इच्छेखातर त्यामध्ये सक्रिय सहभाग घेतलेल्या काही निवृत्त सनदी अधिका:यांना राजकारण प्रवेशाचे वेध लागले आहेत. निवृत्त आरोग्य सचिव जी.एस. गिल व निवृत्त गृहनिर्माण सचिव रामाराव हे भाजपामध्ये प्रवेश करण्याची औपचारिकता बाकी आहे तर कोकण विभागाचे निवृत्त विभागीय आयुक्त विजय नहाटा यांच्यापाठोपाठ निवृत्त परिवहन सचिव संगीतराव हे शिवसेनेच्या उंबरठय़ावर आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या काळात मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी अचानक सेवेचा राजीनामा देऊन उत्तर प्रदेशातून भाजपाची उमेदवारी मिळवली. तसे धक्कातंत्र विधानसभा निवडणुकीत एखादा सेवेतील अधिकारी दाखवेल, अशी शक्यता सध्या दिसत नाही. मात्र निवृत्त सनदी अधिकारी शिवसेना-भाजपाचे दार निश्चित ठोठावत आहेत. सनदी सेवेतून निवृत्ती पत्करल्यावर विजय नहाटा यांनी शिवसेनेत प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीत त्यांच्याकडे बेलापूर मतदारसंघाची जबाबदारी पक्षाने सोपवली होती. यापूर्वी गोपीनाथ मुंडे यांनी सुरेश हावरे यांच्याकरिता बेलापूर मतदारसंघ शिवसेनेकडून मागून घेतला होता. आता नहाटा यांच्याकरिता शिवसेनेला हा मतदारसंघ परत हवा असल्याचे समजते. संगीतराव हेही शिवसेनेच्या कामात सक्रिय असून, त्यांचा औपचारिक प्रवेश बाकी आहे. मात्र त्यांनी शिवसेनेकडे उमेदवारी मागितलेली नाही. याबाबत विजय नहाटा यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, राजकारण हे धकाधकीचे क्षेत्र आहे. ज्यांना निवृत्तीनंतर शांत जीवन जगायचे आहे त्यांनी राजकारणात येऊ नये. निवृत्तीनंतर सनदी अधिका:यांना मिळू शकतील अशी डझनभर पदे आहेत. मात्र राजकारणात यशस्वी झाल्यास नवे करियर होऊ शकते. गेली सात ते आठ वर्षे भाजपामध्ये सक्रिय असलेले सुप्रसिद्ध पोलीस अधिकारी वाय.सी. पवार यांनी पक्षाने आदेश दिला तर त्या मतदारसंघातून लढण्याची तयारी दाखवली. तर निवृत्त आयपीएस अधिकारी व इन्काउंटर फेम प्रदीप शर्मा हे भाजपाकडून अंधेरीमधून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. तशी होर्डिग्जही त्यांनी लावली आहेत.
च्चिरंजीवी यांच्या प्रजा राज्यम् पक्षातून यापूर्वी निवडणूक लढवलेले व पराभव पत्करावा लागलेले रामाराव हे आता भाजपामध्ये प्रवेश करीत आहेत. त्यांना चेंबूर मतदारसंघातून उमेदवारी हवी आहे. जी.एस. गिल हेही भाजपाच्या वळचणीला जाणार आहेत. मात्र त्यांच्या उमेदवारीबाबत अजून स्पष्टता आलेली नाही.
च्सनदी सेवेत असताना राजकारण्यांशी संघर्ष केलेले व काहीवेळा वादग्रस्त ठरलेले उत्तम खोब्रागडे हेही भाजपामध्ये सामील होणार असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी सांगितले. खोब्रागडे यांना थेट निवडणूक लढवायची नसून निवडणूक नियोजनाच्या कामात सहभागी व्हायचे आहे, असेही खडसे यांनी सांगितले.