Join us  

निकालाची ऐशीतैशी! विद्यार्थी संतापले...आजपासून उपोषण : राष्ट्रपती, पंतप्रधानांनाही पाठविले पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 3:32 AM

मुंबई विद्यापीठाने १९ सप्टेंबरला सर्व निकाल जाहीर केले. पण, प्रत्यक्षात अजूनही ११ हजार विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झालेले नाहीत.

मुंबई : मुंबई विद्यापीठाने १९ सप्टेंबरला सर्व निकाल जाहीर केले. पण, प्रत्यक्षात अजूनही ११ हजार विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झालेले नाहीत. पहिले सत्र संपत आले तरी निकाल हाती नसल्याने विद्यार्थी तणावाखाली आहेत. तरीही विद्यापीठ ढिम्म असल्याने आता विद्यार्थी पुढे येऊन सामान्य विद्यार्थ्यांच्या निकालासाठी उपोषण करणार आहेत. अनेक संघटनांनी आंदोलने केली, चर्चा केल्या; तरीही अजूनही विद्यार्थ्यांना निकाल मिळालेले नाहीत. या सगळ्यात सामान्य विद्यार्थी भरडला जात असल्याने या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले आहे.विधि अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला शिकत असलेल्या अमेय मालशे याने मुंबई विद्यापीठात सुरू असलेल्या भोंगळ कारभाराविरुद्ध आता आवाज उठवला आहे. विद्यापीठाशी पत्रव्यवहार करूनही परिस्थितीत बदल झाला नाही. त्यामुळे अमेयने आता या प्रकरणी राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, विद्यापीठाचे कुलपती यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्याने हजारो विद्यार्थ्यांच्या करिअरशी विद्यापीठाने कशा पद्धतीने खेळ सुरू केला आहे, याविषयी माहिती दिली.अमेयने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षीही टीवाय बीकॉमच्या माझ्या निकालाला विलंब झाला होता. त्यामुळे मला चांगले मार्क मिळूनही लांबच्या विधि महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे. या वर्षीही माझा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. त्यामुळे आता मला महाविद्यालय बदलता येणे शक्य नाही. ही माझ्या एकट्याची व्यथा नाही. माझ्यासारख्या अनेक सामान्य विद्यार्थ्यांना आज हेच सहन करावे लागत आहे. त्यामुळे आता सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. म्हणून मी बुधवारी १० आॅक्टोबरला कलिना कॅम्पसमधील परीक्षा भवनासमोर उपोषणाला बसणार आहे. आॅक्टोबर महिना उजाडूनही विद्यापीठ निकाल लावत नाही.पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असलेल्या अनेक विद्यार्थ्यांचे निकाल यंदा उशिरा लागल्याने नुकसान झाले आहे. जून महिन्यात जाहीर होणारे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. पण, एवढे सगळे घडूनही विद्यापीठ विद्यार्थ्यांकडे लक्ष देत नाही. सामान्य विद्यार्थी यात भरडला जात आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. म्हणून माझ्या मित्रांसह आता मी उद्यापासून उपोषणाला बसणार आहे. दोन दिवसांत सर्व निकाल जाहीर करावेत अशी माझी प्रमुख मागणी आहे.

टॅग्स :मुंबई विद्यापीठविद्यार्थी